
सावंतवाडी : संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पद्धतीने रिंगण व दिंडीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन, प्रशालेच्या मुख्याध्यापिका , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या भक्तीमय वातावरणात उपस्थित राहून विठ्ठल नामाच्या जय घोषात तल्लीन झाले. यावेळी सर्व विद्यार्थी वारकरी भूषेत होते. रिंगण सोहळा प्रशालेच्या प्रांगणात मोठ्या भक्तीभावाने पार पडला. टाळ मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा.. माऊली... तुकारामच्या... जयघोषात सर्वांनी रिंगणात सहभाग घेतला. त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांची निरवडे झरबाजार ते निरवडे भूतनाथ मंदिर पर्यंत भजन, कीर्तन करत दिंडी काढण्यात आली.
या दिंडीत सर्व विद्यार्थी लीन होऊन विठू नामाचा गजर करीत पुढे निघाले. या सर्व छोट्या वारकऱ्यांचा उत्साह पाहून परिसरातील सर्व भाविक व नागरिक यांनीही या वारीत विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेत आपला सहभाग दर्शविला. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची व विठोबा रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती.विविध घोषवाक्यांनी शिक्षण व संस्कार याबाबत जनजागृती करीत ही वारी पुढे निघाली होती. अशा प्रकारे संस्कार नॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी पूर्ण जल्लोषात साजरी करण्यात आली.