
सावंतवाडी : आपल्या स्वतःचा, कुटुंबाचा समाजाचा आणि गावाचा उत्कर्ष करावयाचा असेल तर विद्यार्थी दशेपासूनच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा शालांत परीक्षांचा निकाल शंभर टक्के असतो. मात्र स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शन अभावी आमचे विद्यार्थी कमी पडतात. म्हणून आगामी काळात विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची कास धरून अधिकारी व्हावे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित दहावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ कार्यक्रमात केले.
यावेळी व्यासपीठावर आजगावच्या सरपंच यशस्वी सौदागर, शालेय समितीचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ अण्णा झांट्ये, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, प्रशालेचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर, प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत, शिक्षक - पालक संघ उपाध्यक्ष श्रीमती दिव्या काळोजी, माजी उपाध्यक्ष बाबाजी गोवेकर, वैष्णवी आजगावकर, सेजल रेडकर, पालक व सामाजिक कार्यकर्ते अनंत पांढरे, पत्रकार मदन मुरकर, साबाजी परब, अध्यापक विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक मारुती कांबळे, प्रा. गणेश तुंगार, श्रीमती वर्षा रेवाडकर यांसह अन्य उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले.
यावेळी आजगावच्या सरपंच यशस्वी सौदागर म्हणाल्या, आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांच्या मेहनतीमुळे आज शाळेची प्रगती अत्यंत अभिमानास्पद होत आहे. या शाळेसाठी जे जे सहकार्य लागेल ते सर्व ग्रामपंचायत स्तरावरून नक्कीच करण्यात येईल, असे सांगत त्यांनी यंदाही ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वितरण करणार असल्याचे नमूद केले. धाकोरा गावच्या सरपंच सौ. स्नेहा निलेश मुळीक यांनीही आपल्या मनोगतातून शाळेच्या प्रगतीचा आनंद होत असल्याचे सांगितले. तसेच धाकोरा गावाच्या वतीने आजगाव शाळेसाठी नेहमीच मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. शालेय समितीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा झांटये यांनी देखील आजगाव प्रशालेच्या सध्याच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून याचे श्रेय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. तसेच येणाऱ्या काळात आजगाव शाळेच्या प्रगतीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून आजगाव शाळेच्या विविध गरजांची पूर्तता करण्यात येईल. तसेच शाळेने कधीही हाक मारावी, त्यासाठी सर्व माजी विद्यार्थी तन-मन-धनाने हजर राहतील, असे आश्वासित केले.
दरम्यान यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आजगाव प्रशालेची माजी विद्यार्थिनी मानसी पांढरे हिची स्पर्धा परीक्षाद्वारा पुणे कारागृह पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाल्याने प्रशालेच्या वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी केले. सूत्रसंचालन काव्या साळवी यांनी तर आभार प्रदर्शन मानसी परुळेकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी यांसह शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.