
दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर मार्गावर तिलारी भटवाडी घोटगेवाडी तिठ्यावर शनिवारी दुपारी दुचाकी व कार मध्ये झालेल्या अपघातात दोडामार्ग तालुका कृषी कार्यालय येथील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना तातडीने साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. येथील डाॅक्टर तसेच आरोग्य सेविका यांनी तातडीने उपचार करून या दोघांना पुढील उपचारासाठी गोवा येथे पाठविण्यात आले. कृषी कर्मचारी जखमी झाले हे समजताच अनेक जण आरोग्य केंद्रात दाखल झाले होते.
गोवा राज्यातील काही भाविक कार घेऊन नरसोबाची वाडी येथे जाण्यासाठी निघाले होते. तर कृषी कर्मचारी घोटगेवाडी परिसरात कामानिमित्त गेले होते, शनिवारी दुपारी ते काम आटपून माघारी येत असताना दोडामार्ग कडून तिलारी घाट मार्गे नरसोबाची वाडी येथे जाणारी कार तसेच मोटार सायकल दरम्यान अपघात झाला. यात कृषी कर्मचारी साईराम शिंदे तसेच प्रसाद खडपकर, हे दोघे जखमी झाले.