सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ममता जाधव यांचा खास सत्कार

Edited by: विनायक गांवस
Published on: July 05, 2025 18:09 PM
views 39  views

सावंतवाडी : आजगाव केंद्रीय स्तरीय शिक्षण परिषदेत आजगाव केंद्राच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका ममता जाधव यांचा केंद्राच्यावतीने नुकताच  सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख शिवाजी गावित, सत्कारमूर्ती ममता जाधव, नानोस मुख्याध्यापक प्रशांत परब, तिरोडा मुख्याध्यापक जनार्दन प्रभू आजगावकर, धाकोरा मुख्याध्यापिका प्रियांका आजगावकर इत्यादी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी आजगाव केंद्र शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक दत्तगुरु कांबळी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून सौ. जाधव यांच्या सेवेचा आढावा घेऊन आजचा कार्यक्रम म्हणजे शिक्षण परिषद आणि सौ. जाधव यांचा सत्कार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी मानसी परुळेकर-कदम ,काव्या साळवी-कुवळेकर, सुनील गाड, प्रवीण तांडेल, दिपाली केदार, इत्यादीनी जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा  घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर यावेळी जाधव यांचा केंद्राच्या वतीने  केंद्रप्रमुख गावित यांच्या  हस्ते शाल, श्रीफळ  भेटवस्तू  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ. जाधव यांनी सत्काराबाबत कृतज्ञता व्यक्त करून आपले आयुष्य आपले बालपण कसे कष्टात गेले हे स्पष्ट केले. आपली सुरुवात मालवण तालुक्यातील शिरवंडे येथे होऊन वर्षभरातच सावंतवाडी तालुक्यात आजगाव येथे येऊन  आजगाव परिसरात गेले 36 वर्षे आजगाव, तिरोडा, शिरोडा आणि पुन्हा आजगाव असाच त्रिकोण पूर्ण करून आज आपण सेवानिवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले. ग्रामस्थ, शिक्षक, पालक, विद्यार्थी, शालेय समित्या यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्ष पदावरून बोलताना केंद्रप्रमुख गावित यांनी  जाधव मॅडम यांची सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत, अपार कष्ट करण्याची जिद्द व मनमिळावू स्वभाव याचा गौरव करून त्यांच्या मुळे आजगाव केंद्र च काम सुरळी सुरू होतं हे स्पष्ट केले, त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भासेल असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीस  शुभेच्छा दिल्या शेवटी प्रवीण तांडेल यांनी आभार मानले. दरम्यान यापूर्वी केंद्र शाळा आजगाव नंबर एक मध्ये सर्व  शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ,  माता व  पालक संघ व सर्व पालक व सरपंच  ग्रामपंचायत यांनीही  सोहळ्यानिमित्त सत्कार केले