
सावंतवाडी : ऐतिहासिक बांधकाम वर्षांनुवर्षे टिकते. मात्र, आजची बांधकाम वर्षभर टिकत नाही, ही शोकांतिका आहे. तिनं- तिनं महिन्यात बील निघतील अशी कामं करू नका असे स्पष्ट निर्देश बांधकाम विभागाला दिलेत. कायमस्वरूपी टीकेल असं काम अपेक्षित आहे. माझ्या कारकिर्दीत अशी उधळपट्टी करायला मी देणार नाही असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी सा.बां.ला दिला. तसेच सा.बां.चे मुख्य अभियंता श्री. राजभोग यांच्याशी बोलणं झालं असून ते स्वतः पहाणी करणार आहेत. ऐतिहासिक वास्तूंसोबत अशा घटना घडता नये हीच भूमिका सरकारची आहे. बांधकामनं काम करताना काळजी घेतली पाहिजे होती. हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणारा मी नाही.अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार अशी माहिती त्यांनी दिली. सावंतवाडी येथील जिल्हा कारागृह पहाणीनंतर मंत्री राणे बोलत होते.
संस्थानकालीन जिल्हा कारागृहाची सुमारे १४३ वर्षांपूर्वीची काळा दगड आणि मातीपासून बांधलेली संरक्षक भिंत कोसळली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज या ठिकाणी दाखल होत पहाणी केली. अंदाजे ४० मीटर लांबीची ही भिंत कोसळल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. याची पहाणी मंत्री नितेश राणे यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, पोलिस उप अधीक्षक विनोद कांबळे, जिल्हा कारागृह अधीक्षक संजय मयेकर, सावंतवाडी कारागृह अधीक्षक सतिश कांबळे, सार्वजनिक बांधकाम उप अभियंता वैभव सगरे, अभियंता विजय चव्हाण आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे पुढे म्हणाले, १४३ वर्ष जुनी ही वास्तू आहे. भितींच्या वरच काम सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं होतं. अशा घटना घडू नये यासाठी भविष्यात दक्षता घेतली जाईल, संपूर्ण इमारतीचा ऑडिट रिपोर्ट नव्यानं करण्यात येणार आहे. त्यामुळे नेमकी कुठे डागडुजीची आवश्यकता आहे हे देखील लक्षात येईल. या खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ, जिल्हा नियोजन मधून ज्या गोष्टी करता येईल त्या कायमस्वरूपी करु अशी माहिती दिली. तसेच रिपोर्ट आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशीही मी चर्चा करणार आहे. अशा वास्तू जपण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. पुढची १०० वर्ष टीकेल असंच काम केलं जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागानं काम करताना काळजी घेतली पाहिजे होती. अन्यथा, ही घटना घडली नसती. त्यामुळे हलगर्जीपणा करणाऱ्यांना सोडणारा मी नाही. अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणार अशी माहिती मंत्री श्री. राणे यांनी दिली.
दरम्यान, दरवर्षानुवर्षे केलेलं बांधकाम टीकत. पण, हे बांधकाम वर्षभर टिकत नाही ही खरी शोकांतिका आहे. तिनं तिनं महिन्यात बील निघतील अशी कामं करू नका असे स्पष्ट निर्देश आम्ही दिलेत. कायमस्वरूपी टीकेल असं काम करणं अपेक्षित आहे. माझा कारकिर्दीत अशी उधळपट्टी करायला मी देणार नाही. गरज होती म्हणून वरची भिंत वाढवली. पण, काळजी घेतली नाही. यात चुका झाल्या असून जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल असा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला. यावेळी भाजपचे महेश सारंग, श्वेता कोरगावकर, राजन म्हापसेकर, अंकुश जाधव, सुधीर आडिवरेकर, रविंद्र मडगावकर, गुरूनाथ पेडणेकर, मोहीनी मडगावकर, ॲड. परिमल नाईक, महेश धुरी, अजय गोंदाळे, उदय नाईक, मधु देसाई, दिलीप भालेकर, गुरुनाथ मठकर, बाबा काणेकर, मेघना साळगावकर, उमेश पेडणेकर, संजय शिरसाट, चंद्रकांत जाधव, कुणाल शृंगारे आदी उपस्थित होते.