
सावंतवाडी : सावंतवाडी जिल्हा कारागृहाची उत्तरेकडील मुख्य तटभिंत आज सकाळी कोसळल्याने आणि इतर तटभिंतींनाही धोका निर्माण झाल्याने नागरिकांच्या आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी कारागृहाभोवतीचे वाहतुकीचे रस्ते तात्पुरते बंद करण्याचा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेने घेतला आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १७३ क नुसार हे रस्ते ४ जुलै २०२५ पासून बंद करण्यात येत आहेत. बंद करण्यात आलेले रस्ते कारागृहाच्या उत्तरेकडील घोगळे सर्व्हिसिंग सेंटर ते सावंत प्लाझा रोड, कारागृहाच्या मागील रोड, कारागृहाच्या दक्षिण बाजूचा, म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान मागील रोड बंद केले आहे. तर वरील तिन्ही रस्ते बंद झाल्याने नागरिकांना व वाहनचालकांना गैरसोय होऊ नये यासाठी, सावंतवाडी नगरपरिषदेने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. राज्य महामार्गापासून खासकीलवाडा येथून जाणारा रोड, महालक्ष्मी मॉल समोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यानाच्या बाजूने खेमराज हाउसिंग सोसायटी समोरून नवसरणीकडे जाणारा रोड यांचा वापर करावा. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या सूचनेची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेने केले आहे.