जिल्हा कारागृहाची ऐतिहासिक भिंत १४३ वर्षांची ; ४० मीटर कोसळली

Edited by: विनायक गांवस
Published on: July 04, 2025 19:39 PM
views 253  views

सावंतवाडी : संस्थानकालीन जिल्हा कारागृहाची सुमारे १४३ वर्षांपूर्वीची १८८२ मध्ये काळा दगड आणि मातीपासून बांधलेली संरक्षक भिंत आज कोसळली. अंदाजे ४० मीटर लांबीची ही भिंत कोसळल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले असून नवीन संरक्षक भिंत उभारण्यासाठी जवळपास ५० लक्ष रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यानंतर येथील ४२ कैद्यांची सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 ही ऐतिहासिक संरक्षक भिंत सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यांपूर्वी तटबंदीची उंची वाढवण्यासाठी केलेल्या कामामुळेच कोसळली असल्याची टीका होत आहे. कारागृहाभोवतीच्या संरक्षक भिंतींवर तटबंदीची उंची वाढवण्यासाठी सुमारे ३२ लाख रुपये खर्च करून काम करण्यात आले होते. मात्र, खरेतर स्ट्रक्चरल ऑडिट करून तटबंदीची उंची वाढवण्यासाठी चिरा आणि सिमेंटचे काम केले जाणे अपेक्षित होते असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे. तसे न केल्यानेच ही जुनी भिंत कोसळल्याचा आरोप होत आहे. या घटनेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सगरे, अभियंता विजय चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज कोसळलेल्या संरक्षक भिंतींची लांबी ४० मीटर असल्याची पुष्टी केली. ही भिंत १८८२ ची दगड-मातीची होती आणि तिच्यावर तटबंदीची उंची वाढवण्यासाठी काम करण्यात आले होते असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह कोसळलेल्या भिंतीचा पंचनामा केला असल्याची माहिती दिली. ती ४० मीटर कोसळली आहे असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर, पोलिस उप अधीक्षक विनोद कांबळे, जिल्हा कारागृह अधीक्षक संजय मयेकर, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी पहाणी केली.दरम्यान, ३८ पुरुष व ४ महिला कैद्यांची सिंधुदुर्ग नगरी येथील कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक सतिश कांबळे यांनी दिली आहे.