
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक दुर्ग यशवंतगड याच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, या कामावरून आता वाद निर्माण झाला आहे. पुरातत्व विभागानं गडाच्या जीर्ण झालेल्या आणि खऱ्या अर्थाने संवर्धनाची गरज असलेल्या वास्तूंकडे दुर्लक्ष करून, अनावश्यक कामांवर निधीची उधळपट्टी केल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि इतिहासप्रेमींकडून केला जात आहे.
मंजूर निधीतून गडाचे हजारो वर्षे ऊन, वारा, पाऊस यांचा सामना करत उभे असलेले जुने झालेले बुरुज, तट आणि इतर ऐतिहासिक वास्तू, ज्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि इतिहासाची साक्ष देत आहेत, त्यांची डागडुजी करण्याऐवजी पुरातत्व विभागाने जमिनीला लाद्या,फरशी लावण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पडलेल्या वास्तू दुरुस्त करण्याऐवजी गरज नसलेले बांधकाम करून ठेवले आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पुरातत्व विभागाचा हा कारभार 'भोंगळ' असून यामुळे शासनाच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करताना त्यांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता, त्यांची डागडुजी करणे अपेक्षित असते. मात्र, यशवंतगडावरील सध्या सुरू असलेले काम पाहता, पुरातत्व विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि त्यांच्या हेतूंवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. इतिहासप्रेमींनी शासनाने या प्रकरणात लक्ष घालून मंजूर निधीचा योग्य वापर होत आहे की नाही ? याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.