
सावंतवाडी : मुख्याधिकारी नसल्यामुळे सावंतवाडी शहराचा कारभार बेभान पद्धतीने सुरू आहे. कर्मचाऱ्यांना कोणतेही सोयर-सुतक नाही. त्यामुळे आरोग्याचे, पाण्याचे, रस्त्याचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आशिष सुभेदार यांनी केली आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, या ठिकाणी कार्यरत असलेले सागर साळुंखे हे पालकमंत्री नितेश राणे यांचे ओएसडी म्हणून रुजू झाले. त्यांच्या नंतर आलेले मुख्याधिकारी अवघ्या दोन महिन्यांतच बदली होऊन गेल्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती आणि इतर अनेक नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्याधिकारी नसल्याने निर्णय प्रक्रिया थांबली असून त्याचा थेट परिणाम जनतेला सोसावा लागत आहे. या सततच्या बदल्यांमुळे आणि मुख्याधिकारी नसल्यामुळे जनतेची हेळसांड होत असल्याचे सुभेदार यांनी म्हटले आहे.