
सावंतवाडी : गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून दाखले मोफत मिळण्याची अपेक्षा असताना सावंतवाडी येथील सेतू सुविधा केंद्रात दाखल्यांसाठी दुप्पट शुल्क आकारले जात असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे. 'लाडकी बहीण' योजनेमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडल्याने सरकार विविध मार्गांनी पैसा गोळा करत असून त्यात शालेय विद्यार्थ्यांनाही सोडले जात नसल्याची टीका राऊळ यांनी केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांकडून दाखल्यांसाठी अवाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर, सेतू सुविधा आणि तहसीलदार यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेतली असता धक्कादायक माहिती समोर आल्याचे राऊळ यांनी सांगितले. बऱ्याच पालकांनी दाखल्यांसाठी लूटमार सुरू असल्याची तक्रार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे केली होती.सेतू सुविधा केंद्रातून दरमहा सुमारे दोन हजार दाखले दिले जातात, ज्यात सर्वाधिक दाखले शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी लागतात. या प्रत्येक दाखल्यासाठी ७० रुपये आकारले जातात, ज्यापैकी ३५ रुपये सेतू सुविधेकडे आणि ३५ रुपये शासनाकडे जमा होतात. शिक्षणासाठी शासनाने दाखले मोफत द्यावेत आणि शैक्षणिक दाखल्यांसाठी शुल्क माफ असावे अशी अपेक्षा असताना, तसे होत नसल्याचे राऊळ यांनी म्हटले आहे. शासनाने ही लुबाडणूक थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
'लाडकी बहीण' योजना राबविल्यामुळे सरकार विविध माध्यमातून निधी गोळा करत असून, त्यात गोरगरीब विद्यार्थ्यांनाही दाखल्यासाठी भरमसाट वाढ करून लुबाडणूक करत असल्याचा आरोप रूपेश राऊळ यांनी केला.
दाखल्यांचे शुल्क आणि कालावधी जाहीर
सावंतवाडी शहरातील सेतू सुविधा केंद्राने विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी लागणारे शुल्क आणि आवश्यक कालावधीची माहिती जाहीर केली आहे. केंद्राने दिलेल्या माहितीनुसार:१५ दिवसांचा कालावधी लागणारे दाखले: उत्पन्नाचा दाखला, अधिवास/राष्ट्रीयत्व दाखला, रहिवास दाखला, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र (६५ वर्षे), शेतकरी दाखला आणि डोंगरी दाखला. या प्रत्येक दाखल्यासाठी रु. ६९/- (एकोणसत्तर रुपये) शुल्क आकारले जाईल. स्कॅन केलेल्या प्रतिसाठी प्रत्येक पानासाठी रु. २/- (दोन रुपये) अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. ४५ दिवसांचा कालावधी लागणारे दाखले: जातीचे प्रमाणपत्र (ओबीसी/एस.ई.बी.सी., एस.बी.सी./इ.डब्ल्यू.एस., एस.सी., व्ही.जे./एन.टी.) आणि नॉन-क्रिमिलेअर दाखले. या दाखल्यांसाठीही रु. ६९/- शुल्क आणि स्कॅन केलेल्या प्रतिसाठी प्रत्येक पानासाठी रु. २/- असे शुल्क आकारले जाईल, असे फलकांवर दर पत्रक प्रसिद्ध केले आहे अशी माहिती श्री. राऊळ यांनी दिली आहे.