
सावंतवाडी : स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता 'एआयचा' वापर करावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा निश्चितच फायदा होईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले. पंचम खेमराज तथा पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांचे काम चांगले होते. त्यांनी त्याकाळात आरोग्य, शिक्षण, रस्ते अशा प्रश्नांना महत्त्व दिले होते. म्हणूनच त्यांना रामराजा असे म्हटले जाते. त्यांची दूरदृष्टी त्यांच्या कार्यातून समजते असे मत त्यांनी व्यक्त केले. स्व. बापूसाहेब महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आज येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाकडून साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सावंतवाडी संस्थांचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी सावंत भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे सावंत भोसले, संस्थांचे राजगुरू राजेंद्र भारती महाराज, जिल्हाधिकारी अनिल पाटील, प्रांताधिकारी हेमंत निकाम,तहसीलदार श्रीधर पाटील, पंचम खेमराज महाविद्यालय प्राचार्य दिलीप भारमल,जयप्रकाश सावंत सतीश सावंत, दिलीप देसाई, ॲड. शामराव सावंत आदींसह शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुले ही दहावी-बारावी पर्यंत पुढे दिसतात. मात्र, स्पर्धा परीक्षेसाठीही आपण तयार पाहिजे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही किती अभ्यास करता याला महत्त्व नाही. तर तो कसा अभ्यास करता ? त्यातील काय बारकावे काय ? हे टिपणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने नियोजनबद्ध अभ्यास करून आपण पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावे. प्रशासकीय सेवेत अनेक संधी आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन आमच्याकडून नेहमीच राहणार आहे. मुलांनी स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान वाढवण्यासाठी एआय तंत्रज्ञाचा वापर केल्यास त्याचा फायदा निश्चितच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज हे लोककल्याणकारी राजा होते. त्यांनी ब्रिटिशांच्या काळात आपल्या राज्यातील जनतेला आवश्यक असलेले सकारात्मक निर्णय घेतले होते. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महात्मा गांधीजींनी त्यांना रामराजे असा उल्लेख केला होता. त्यांच्या कार्याची दखल निश्चितच घेतली गेली पाहिजे.
यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेमसावंत भोसले म्हणाले, या ठिकाणी बापूसाहेब महाराज यांच्या माध्यमातून ब्रिटिश काळात अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. मात्र, अन्य देशांच्या तुलनेत आमचे संस्थान छोटे असल्यामुळे त्यांची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही. मात्र, येणाऱ्या पिढीने हे काम केले पाहिजे. बापूसाहेब महाराजांचे कार्य देशभर पोहोचले पाहिजे त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील नागरिकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असं सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकाचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते खेमराजीय या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.