मुख्य धबधब्यावर वाहतूक कोंडी

Edited by: विनायक गांवस
Published on: June 29, 2025 20:09 PM
views 81  views

सावंतवाडी : आंबोलीमध्ये रविवारी पर्यटकांनी विक्रमी गर्दी केली. यामुळे मुख्य धबधब्यावर वाहतूक कोंडी झाली. सिंधुदुर्ग, गोवा आणि कोल्हापूर येथून मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रण करणे पोलिसांनाही कठीण झाले. परिणामी, सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक पूर्ववत झाल्यावर पर्यटक आणि वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास टाकला. रविवारी मुख्य धबधब्यापाशी वाहनांची रांग तब्बल दोन किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. तर बाजारवाडी येथेही एक किलोमीटरपर्यंत वाहनांची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे शनिवारीच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी आंबोलीतील पर्यटन स्थळांना भेट देऊन मुख्य धबधब्याच्या ठिकाणाची पाहणी केली होती. वाहतूक कोंडीमुळे एस.टी. बसेस एक ते दीड तास उशिराने धावत होत्या. ज्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमुळे एका दुचाकी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीलाही फटका बसला, ज्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.