
सावंतवाडी : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत अनेक वर्षांपासून शोध व बचाव कार्य करत अपघातग्रस्तांना आणि प्रशासनाला मोलाचे सहकार्य करणाऱ्या सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली यांना आपत्कालीन बचाव साहित्य प्रदान करण्यात आले आहे. सरपंच सावित्री पालेकर यांनी या उपक्रमासाठी आमदार दीपक केसरकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले आहेत.
चांदा ते बांदा योजना, जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग, आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यामार्फत हे बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मनीष दळवी, एनडीआरएफ कमांडर आर. जे. यादव, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या साहित्याचे वितरण करण्यात आले.
या साहित्यामुळे सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुपचे सदस्य शोध व बचाव कार्य करताना स्वतःची योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रशासनाला आणि अपघातग्रस्तांना अधिक चांगल्या प्रकारे सहकार्य करू शकणार आहेत. आंबोली घाट परिसरात होणाऱ्या अपघातांमध्ये या टीमचे योगदान नेहमीच मोठे असते. या टीमचे सदस्य कोणतीही शासकीय मोबदला न घेता निस्वार्थपणे आणि अविरतपणे जनसेवेचे हे काम करत आहेत.
सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी नमूद केले की, एखाद्या शोध व बचाव टीमला एवढ्या मोठ्या प्रमाणात शोध व बचाव साहित्य उपलब्ध करून देण्याची ही कदाचित पहिलीच घटना आहे. यामुळे येणाऱ्या काळात या टीमला आणि प्रशासनाला शोध व बचाव कार्यात खूप मदत होईल. हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री नितेश राणे आणि महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले.