
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजिशियनची नियुक्ती होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप डॉक्टरांचा पत्ता नाही. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने ऑन-कॉल फिजिशियनची सोय करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचार मिळत नसल्याने त्यांच्या जीवावर बेतत आहे. या परिस्थितीमुळे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असून येथे १३ बेडचा सुसज्ज आयसीयू आणि मोफत सी.टी.स्कॅनची सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये या रुग्णालयाचा १०वा क्रमांक लागतो. तर ओ.पी.डी.मध्ये हे रुग्णालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. असे असूनही केवळ फिजिशियन नसल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अनेकांना गोवा बांबुळी येथे रेफर करावे लागत आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, जे रुग्णालयात २४ तास सेवा पुरवते, त्यांना रुग्ण कल्याण नियामक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. परंतु, येथील रुग्णांची दयनीय अवस्था पाहून हे पद उपभोगणे आता लाजिरवाणे वाटत असल्याची खंत प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, रुग्णालयात एक फिजिशियन आणून रुग्णांचे प्राण वाचवण्यात खऱ्या अर्थाने देवपण आहे. रुग्णांच्या सेवेसाठी काहीही करण्यास आम्ही तयार आहेत. पण, रुग्णांचे प्राण डोळ्यासमोर जाताना पाहू शकत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे प्राण वाचवणारे खरे देव म्हणजे गोवा बांबुळी येथील डॉक्टर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लवकरच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त करून सत्कार करण्यात येणार असल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीवर तात्काळ तोडगा काढून रुग्णालयात कायमस्वरूपी फिजिशियनची नियुक्ती करण्याची मागणी प्रा. सतिश बागवे, रुपा मुद्राळे, लक्ष्मण कदम यांनी केली आहे