पाय घसरला ३०० फूट खोल दरीत कोसळला

आंबोली येथील घटना
Edited by: विनायक गांवस
Published on: June 27, 2025 19:29 PM
views 906  views

सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या कोल्हापूर येथील एका पर्यटकाचा पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. राजेंद्र बाळासो सनगर (वय ४५, रा. चिले कॉलनी, कोल्हापूर) असे या पर्यटकाचे नाव असून ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत.

सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळले. या घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती दिली असून ते देखील उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होते. सायंकाळनंतर शोध मोहीम राबवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्या सकाळपासून सुरुवात करण्यात येणार आहे.