
सावंतवाडी : तालुक्यात वीज वितरणचा कारभार पूर्णपणे 'रामभरोसे' सुरू आहे. पाऊस असो किंवा नसो लाईट जाण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. महावितरणचा ढिसाळ कारभार अन् जीर्ण झालेली यंत्रणा याला कारणीभूत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वारंवार वीज खंडित होत आहे. ग्राहकांना गृहीत धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वीज खंडित होण्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने व्यावसायिक आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेत. इन्व्हर्टरचा पर्याय सर्वांसाठी शक्य नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हंगामपूर्व पाऊस सुरू झाल्यापासून वीज वितरण कंपनीचा सावळा गोंधळ अधिकच वाढला आहे. सकाळी असो किंवा मध्यरात्री, कधीही वीज खंडित होत असल्याने व्यवसायांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः दिवसातून अनेकदा, अगदी पाच-पाच मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित होत असल्याने वीजेवर चालणारी यंत्रणा आणि उपकरणे खराब होण्याचे प्रकार वाढले आहेत. या नुकसानीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सावंतवाडी शहरातच जर वीज वितरण कंपनीचा इतका बेजबाबदारपणा सुरू असेल तर ग्रामीण भागातील परिस्थिती किती वाईट असेल ? याचा अंदाज न लावलेला बरा असे नागरिकांचे म्हणणे आहे. वीज महावितरण खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे सत्ताधारी अभिमानाने सांगतात. मात्र, असे असूनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. विजेचा हा दैनंदिन लपंडाव आता सहनशीलतेच्या पलीकडचा झाला आहे. सत्ताधारी पक्षाच्या मान्यवरांनी विजेच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. मात्र, तसे होताना दिसत नाही.
नेमकी समस्या काय आहे हे शोधून काढण्याची मागणी होत आहे. नवीन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यादृष्टीने अधिकारी वर्ग पाठपुराव्यात कमी पडत आहे. यापूर्वी विजेचा लपंडाव इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हता. मग, आताच ही समस्या का निर्माण झाली ? यामागे नेमके कारण काय ? हे लोकांना समजले पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.