
सावंतवाडी : सावंतवाडी येथील ज्येष्ठ पत्रकार प्रवीण रामचंद्र मांजरेकर हे सध्या हृदयविकाराच्या गंभीर आजाराने त्रस्त असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. त्यांचे सुपुत्र प्रणय मांजरेकर यांनी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना मदतीसाठी भावनिक आवाहन केले आहे. प्रवीण मांजरेकर यांना २५ एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील चितारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. २७ एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने गोवा मेडिकल कॉलेज (GMC), बांबोळी येथे हलवण्यात आले. अँजिओग्राफी तपासणीत त्यांच्या हृदयाच्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक झाल्याचे निष्पन्न झाले असून हृदयाची कार्यक्षमता केवळ २०% इतकीच राहिली आहे. सुरुवातीच्या उपचारानंतर ९ मे रोजी त्यांना घरी सोडण्यात आले असले तरी १५ जून रोजी पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सावंतवाडीतील कॉटेज हॉस्पिटल आणि त्यानंतर ओरोस जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, कार्डिओलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने त्यांना पुन्हा GMC मध्ये दाखल करावे लागले, जिथे त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
सध्या त्यांच्यावर LVF (Left Ventricular Failure) चे उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे की, त्यांना स्टेंट्स बसवता येणार नाहीत. त्यांच्यावर बायपास सर्जरी हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. परंतु त्यासाठी आधी हृदयाची शक्ती वाढणे आवश्यक आहे. आतापर्यंत अँजिओग्राफी, 2D इको, चेस्ट एक्स-रे, रीनल यूएसजी, सीबीसी, आरएफटी, एलएफटी, ईसीजी, एबीजी, डॉपलर रीनल आर्टरी स्कॅन यांसारख्या अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. उपचारांवरील खर्च सातत्याने वाढत आहे. प्रवीण मांजरेकर यांचे एकुलते एक सुपुत्र प्रणय मांजरेकर हे एकटेच वडिलांच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी समाजातील सर्व घटकांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे. आपली छोटीशी मदतही प्रवीण मांजरेकर यांना जीवनदान देऊ शकते, असे प्रणय यांनी नम्रपणे म्हटले आहे. सावंतवाडीतील पत्रकार बांधवानी देखील मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मदतीसाठी संपर्क आणि तपशील:
रुग्णाचे नाव: प्रवीण रामचंद्र मांजरेकर
व्यवसाय: पत्रकार
पत्ता: खासकीळवाडा, सावंतवाडी
संपर्क (प्रणय मांजरेकर): 7507266814
UPI ID: pranay.manjrekar@oksbi
मोबाईल नंबर: 7507266814
बँक तपशील:
नाव: Pranay Pravin Manjrekar
बँक: Bank of India
खाते क्रमांक: 141010110011954
IFSC कोड: BKID0001410
आपली मदत या संकटसमयी मांजरेकर कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकते.