
सावंतवाडी : महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या सातार्डा - न्हयबाग महामार्गावरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत ज्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
विशेषतः कामासाठी दररोज ये-जा करणारे हजारो तरुण-तरुणी आणि पर्यटक यामुळे धास्तावले आहेत. या पुलाचे संरक्षक कठडेही जीर्ण झाले असून त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. २०१६ मध्ये मध्यरात्री सावित्री नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती; सातार्डा पुलावर होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेआणि स्थानिक आमदारांनी दीपक केसरकर यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर यांनी केली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी मलम पट्टी करून डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे. असे न करता त्यावर ठोस उपाय योजना करून आठ दिवसांच्या आत मार्ग निर्धोक करावा असे न केल्यास ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही ही श्री. कवठणकर यांनी दिला आहे. यावेळी संतोष गोवेकर, नामदेव गोवेकर, साई कवठणकर, सदू टेमकर, यामेश्वर कवठणकर, निखिल कवठणकर, सुप्रेश कवठणकर, गिरीश परब, प्रवीण बर्वे, अनिकेत धारगळकर, यश उर्फ दाय कवठणकर, प्रमोद कवठणकर, स्वप्निल हरमलकर, संजय पालव, रघुनाथ जाधव, जयेश पोळजी, माजी उपसरपंच तळवणे आपा बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. या धोकादायक पुलामुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.