
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत यांच्यावर आता दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद कायम ठेवण्यासोबतच त्यांची कोकण विभाग प्रभारी पदीही नियुक्ती करण्यात आली आहे. आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन भाजपने त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात सावंत यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप कामगार मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, कामगार मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस हनुमान लांडगे आणि चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
आपण भाजप, कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहात. संघटनात्मक कामाच्या सोयीच्या दृष्टीने आपणावर कोकण विभाग प्रभारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात येत असल्याचे ॲड. विजय हरगुडे दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. त्यामुळे नारायण सावंत यांच्या या दुहेरी नियुक्तीमुळे कोकण विभागातील भाजप कामगार मोर्चाच्या कामाला अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.