LIVE UPDATES

आभार भोवले, कौतुक उलटलं !

सी.टी.स्कॅन सेवा बंद ; सरकारकडून पेमेंट थकलं
Edited by: विनायक गांवस
Published on: June 13, 2025 13:57 PM
views 476  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर मोफत सी.टी.स्कॅन तपासणी केंद्र सुरू करण्यात आले होते. मागील वर्षभरत २४ तास अत्यावश्यक सेवा सरकार व माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झाली होती. आजवर जवळपास 9 हजार पेक्षा जास्त रुग्णांना या विनामूल्य सेवेचा लाभ मिळाला. त्यामुळे येथील जनतेने सरकार आणि प्रशासनाचे आभार मानले. मात्र, कौतुक सोहळ्याला २४ तास उलटायच्या आतच ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद करण्यात आली आहे. थकित ठेवलेली रक्कम याला कारणीभूत ठरली आहे.

गेले वर्षभर या मोफत सेवेमुळे पेशंटला इतरत्र हलविण्यासाठी होणारा मनस्ताप व हजारोंचा पडणारा आर्थिक भुर्दंड देखील वाचला होता. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले होते. मात्र, कौतुक सोहळ्याला २४ तास उलटण्यापूर्वीच ''आभार भोगवले, कौतुक उलटलं !'' अस म्हणायची वेळ जनतेवर आली आहे. आज सकाळपासून ही सेवा अमर्यादित काळासाठी बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून तब्बल ३७ कोटी रूपये या कंपनीचे थकित राहिले आहेत. त्यामुळे सावंतवाडी येथीलही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्याची विनंती आपण येथील स्टाफला केल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी दिली. या गैरसोईमुळे सकाळपासून येथे सिटीस्कॅन साठी येणाऱ्या रूग्णांना माघारी जावं लागत आहे. या रुग्णांना सिटीस्कॅन चाचणीसाठी प्रायव्हेटमध्ये तीन ते चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय कुडाळ, ओरोस, गोवा येथे चाचणीसाठी जाण्यायेण्याचा खर्च वेगळा. त्यामुळे ते गोरगरीब रुग्णांना परवडण्यासारखे नाही. याचा विचार करता राज्य सरकारननं त्या कंपनीचा प्रश्न मार्गी लावून मोफत सेवा पुर्ववत करावी. आभार भोवले, कौतुक उलटलं म्हणायची वेळ जनतेवर आणू नये अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.