LIVE UPDATES

सावंतवाडीत ९ जूनला 'संगीत संशयकल्लोळ'

Edited by: विनायक गांवस
Published on: June 08, 2025 13:40 PM
views 40  views

सावंतवाडी : सद्गुरु संगीत विद्यालय आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ जूनला रात्री ९ वाजता नगरपरिषदेच्या बॅ.नाथ पै. सभागृहात 'संगीत संशयकल्लोळ' या संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जमा होणारा निधी हा रोटरी क्लबच्या इमारतीचे  नूतनीकरण व डागडुजीसाठी वापरण्यात येणार आहे अशी माहिती रोटरीचे इव्हेंट चेअरमन राजेश पनवेलकर यांनी दिली.

यावेळी सचिव सुनील शेलटकर, सदस्य दिलीप म्हापसेकर, सद्गुरु संगीत विद्यालयाचे निलेश मेस्त्री, किशोर सावंत आदी उपस्थित होते. यावेळी श्री. पनवेलकर म्हणाले, सध्या दशावतार प्रयोगांचे प्रमाण जास्त असताना, संगीत नाटकं मात्र लोप पावत चालली आहेत. संगीत नाटकांना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणण्याच्या उद्देशाने सद्गुरु संगीत विद्यालय आणि रोटरी क्लब यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या संगीत नाटकांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, त्यामुळे या नाटकालाही चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. या नाटकात सद्गुरु संगीत विद्यालयातील सर्व स्थानिक कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच, नवीन कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि त्यांना संधी देण्याचा मानसही या आयोजनामागे आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक भाऊ साळगावकर हे या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त नाट्यप्रेमींनी या संगीत नाटकाचा लाभ घ्यावा आणि या उपक्रमाला पाठिंबा द्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.