
वेंगुर्ले : महिला सक्षमीकरण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतील महिला प्रतिनिधींच्या नेतृत्ववृद्धीसाठी ' विलीड' उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग डायोसिजन विकास संस्था सावंतवाडी,वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस,समता प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सामाजिक संवेदना आजरा, दिशा सामाजिक संस्था चंदगड आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सावंतवाडी येथील नवसरणी येथे करण्यात आले.
या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे पंचायत राज व्यवस्था आणि महिला सदस्यांची क्षमता बांधणी करून त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडता याव्यात यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गावांमधून महिला सरपंच आणि महिला ग्रामपंचायत सदस्य यांचा या शिबिरात सक्रिय सहभाग लाभला.ढोलगरवाडी, कारीवाडे, लक्किट्टे, एरडोळ, पेरणोली, पारपोली, कुणकेरी, तुळस, मातोंड, पाल, मठ, होडावडे, घावनळे, आंबोली आदी गावातील महिला सरपंच आणि महिला सदस्य सदर शिबिरास उपस्थित होते.
शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. उपस्थित महिलांचे स्वागत करताना आयोजकांनी सांगितले की, “महिलांना निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाल्याशिवाय खऱ्या अर्थाने लोकशाही सक्षम होऊ शकत नाही. त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे.”
या प्रशिक्षण शिबिरात महिला प्रतिनिधींना प्रशासनिक कौशल्य, निर्णयक्षमता, शासकीय योजना, कायदेशीर अधिकार, महिला हक्क, आणि ग्रामविकासातील त्यांची भूमिका या मुद्द्यांवर सखोल माहिती दिली गेली. महिलांनी त्यांच्या ग्रामपंचायतींमध्ये स्वयंपर्यंत निर्णय घेण्याची क्षमता कशी विकसित करावी याबद्दल मार्गदर्शन मिळाले. शिबिराच्या समारोपाला बोलताना अनेक महिला प्रतिनिधींनी या प्रशिक्षणामुळे नवीन आत्मविश्वास, सुस्पष्ट दिशा आणि प्रभावी संवादकौशल्य लाभल्याचे सांगितले.
एक महिला सरपंच म्हणाल्या, “आजपर्यंत आम्ही काम करत होतो, पण अनेक गोष्टींची नीट माहिती नव्हती. या प्रशिक्षणामुळे आमच्यात बदल घडत आहे. आता आम्ही अधिक प्रभावीपणे काम करू. सदर उपक्रम भविष्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील राबवण्याचा आयोजकांचा मानस असून, महिलांचा सामाजिक व राजकीय सहभाग वाढवणे, हे यामागील दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. शिबिराचा समारोप करताना आयोजकांनी उपस्थित सर्व महिलांचे आभार मानले व त्यांच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.