सुर्गेंचो वळेसार पुस्तकात कोकणातील मातीचा सुगंध : मंत्री आशिष शेलार

'सुर्गेचो वळेसार' मालवणी काव्यसंग्रहाचं मुंबईत शानदार प्रकाशन
Edited by: विनायक गांवस
Published on: May 27, 2025 11:33 AM
views 133  views

सावंतवाडी : सुर्गेंचो वळेसार या पुस्तकात केवळ शब्द नाहीत तर कोकणातील मातीचा सुगंध, मालवणी भाषेचा गोडवा आणि पारंपरिक संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. हा काव्यसंग्रह मालवणी बोलीच्या जतनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असे गौरवोद्गार मंत्री अँड. आशिष शेलार यांनी यावेळी काढले. मालवणी कवी दादा मडकईकर यांचा 'सुर्गेचो वळेसार' मालवणी काव्यसंग्रह व ४५० म्हणींचा संग्रहाचे प्रकाशन अॅड. शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले. पु ल देशपांडे साहित्य अकादमी, लोककला दालन, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई येथे हा सोहळा संपन्न झाला. 


माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री-मुंबई उपनगर अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते 'सुर्गेचो वळेसार' मालवणी काव्यसंग्रह व ४५० म्हणींचा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. दादा मडकईकर यांनी 'चांन्याची फुला', 'आबोलेचो वळेसार', 'कोकण हिरवेगार' असे मालवणी काव्यसंग्रह लिहिले असून आणखीन एका काव्यसंग्रहाची भर त्यात पडली आहे. आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान दादांनी निर्माण केलं आहे. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या काव्यातून उलगडला आहे. त्यांचा सुर्गेंचो वळेसार हा काव्यसंग्रह मालवणी बोलीच्या जतनासाठी तसेच भाषा, बोलीच्या अभ्यास, संशोधनसाठी त्याचा उपयुक्त ठरेल असे उद्गार मंत्री शेलार यांनी याप्रसंगी काढले. तसेच कोकण हा हृदयाच्या अगदी जवळचा विषय आणि त्याच्या समृद्ध परंपरेचं संचित अशा पुस्तकाद्वारे नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे, ही खरोखरच अभिमानास्पद आणि भावनिक गोष्ट असल्याचे सांगितले.