
सावंतवाडी : कोल्हापूर सावंतवाडी मार्गावर चौकुळ केगदवाडी येथे गोवा ते पुणे जाणाऱ्या एका होंडा सिटी ( एम एच १२ सी वाय २९५० ) या कारची तपासणी केली असता, त्यात गोवा बनावटीच्या दारूचे १५ बॉक्स आढळून आले. या प्रकरणी किरण ज्ञानोबा साळुंके (वय ४६, रा. वाकड, ता. हवेली जि. पुणे) आणि राजेश अंकुश गायकवाड ( वय २९, रा. अंबडवेट, ता. मुळशी, जि. पुणे) या दोन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
रविवारी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी सावंतवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत रु. २ लाख १६ हजार असून, वाहनाची किंमत ५ लाख मिळून एकूण रु. ७ लाख १६ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, आंबोली दूरक्षेत्र अंमलदार पो. हवालदार लक्ष्मण काळे, रामदास जाधव, पोलीस नाईक मनीष शिंदे, होमगार्ड आनंद बरागडे आणि चंद्रकांत जंगले यांनी पार पाडली. पुढील तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.