बाबली गवंडे यांनी जपली माणुसकी

रक्तदान करून रुग्णाला दिलं जीवदान
Edited by:
Published on: May 24, 2025 20:07 PM
views 42  views

सावंतवाडी : सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग येथे उपचार घेत असलेल्या निरवडे कोनापाल येथील विष्णू जाधव यांना रक्ताची तातडीची गरज असताना, 'ऑन कॉल रक्तदाते' संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी प्रतिकूल हवामानातही स्वतः रक्तदान करून माणुसकीचे दर्शन घडवले. ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन बॅग्स अपुऱ्या पडल्याने, रुग्णाला आणखी रक्ताची आवश्यकता होती. रुग्णाचे नातेवाईक, तसेच संस्थेचे नियमित रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांच्याशी संपर्क साधून रक्ताच्या गरजेची माहिती दिली. बाबली गवंडे यांनी तात्काळ ही माहिती संस्थेच्या व्हॉट्सॲप समूहावर प्रसारित केली. मात्र, जिल्ह्याला वादळ, वारा आणि पावसाने झोडपून काढल्यामुळे, रक्तदाते शोधणे आणि त्यांना रक्तपेढीपर्यंत पोहोचवणे हे मोठे आव्हान होते.

अशा कठीण परिस्थितीत, आज २४ मे रोजी 'ऑन कॉल रक्तदाते' संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः जिल्हा रुग्णालय रक्तपेढी गाठून तातडीचे रक्तदान केले. विशेष म्हणजे, सोसाट्याच्या वाऱ्यापावसातही त्यांनी संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांना सोबत घेत ओरोस रुग्णालय गाठले. बाबली गवंडे यांचे हे १७ वे रक्तदान होते.

या प्रसंगी 'ऑन कॉल रक्तदाते' संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते आदेश उर्फ जयराम जाधव यांनी समन्वयासाठी विशेष प्रयत्न केले. तातडीची गरज असताना कोणताही विलंब न लावता रक्तदान केल्याबद्दल बाबली गवंडे यांच्यासह 'ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग' यांचे रुग्णाच्या नातेवाईकांनी मनापासून आभार मानले आहेत. या कृतीमुळे 'ऑन कॉल रक्तदाते' संस्थेने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.