
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट देऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर येवले यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याने रुग्णांचे हाल होत असल्याकडे लक्ष वेधले तसेच औषधे बाहेर लिहून देत असल्याच्या तक्रारी आहेत त्याबाबत विचारणा केली. आम्हाला या रुग्णालयात डॉक्टर आणि पायाभूत सुविधांची काय वानवा आहे ते सांगा ,याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करू, जरूर तर अधिवेशनात आवाज उठवू असे आमदार सावंत यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात आमदार महेश सावंत यांनी भेट दिली त्यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा तसेच पदाधिकारी उपस्थित होते या दरम्यान सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव ही उपस्थित होते.
आमदार महेश सावंत यांनी वार्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर येवले यांच्याशी चर्चा केली. ऑन कॉल डॉक्टर उपलब्ध असल्याने सुविधा मिळणार नाहीत. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि पायाभूत सुविधा नसतील तर रुग्णांना बांबूळी येथे जावे लागत आहेत याबाबत आमदार सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार म्हणाले,उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर पदे भरलेली नाहीत मात्र बांबुळी रुग्णालयात इकडचा रुग्ण गेल्यानंतर आपली खिल्ली उडवतात असे सांगितले तर मायकल डिसोझा म्हणाले, आमदार दीपक केसरकर यांनी रुग्णवाहिका वाटल्या आहेत त्या रुग्ण बांबूळी येथे नेण्यासाठीच का? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी उपस्थितांनी रुग्णालयाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र डॉक्टरांबाबत आपल्या तक्रारी नाही तर डॉक्टर आणि पायाभूत सुविधा नसल्याने हेळसांड होत असल्याकडे लक्ष वेधले. यावेळी आमदार महेश सावंत यांनी वैद्यकीय अधीक्षक यांना या रुग्णालयात वैद्यकीय पदे रिक्त आहेत त्या संदर्भात आणि पायाभूत सुविधा संदर्भात काय असेल त्याची आम्हाला माहिती द्या आम्ही याबाबत आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करू किंवा येत्या अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठवू असे त्यांनी सांगितले.