फडणवीसांच अर्धवट राहिलेले काम पूर्ण होणार ?

Edited by:
Published on: December 08, 2024 10:47 AM
views 1104  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ९ वर्षांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात भुमिपूजन सोहळा पार पडला होता‌. २७ जून २०१५ रोजी लागलेल्या या कोनशिलेला देखील आता दहा वर्षे पूर्ण होणार आहेत. मात्र, ज्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच भूमिपूजन झालं ते टर्मिनस जणू अदृश्य झालं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा भुमिपूजन इव्हेंट पार पडला होता. पण,२०१५ पासून आजतागायत हा प्रकल्प पूर्णत्वास आला नाही. मधल्या ५ वर्षातील राजकीय उलथापालथीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे हा विषय चर्चेला पुन्हा आला आहे. हे अर्धवट काम मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

गेली ९ वर्ष सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न अन् भुमिपूजनाची कोनशिला  धूळखात आहे. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झालेले असताना टर्मिनस काही अद्यापपर्यंत पूर्णत्वास आलेले नाही. तळकोकणवासियांची फसवणूक झाल्याची भावना जनतेत आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत कित्येकदा आवाज उठवला आहे. मात्र, आश्वासनांशिवाय हाती काहीच आलेल नाही. फेज वनच काम झालेलं असताना फेज टूच काम का रखडलं ? हा खरा यक्षप्रश्न आहे. नुकत्याच झालेल्या स्थानक सुशोभीकरणात तर स्थानकाच्या नावातून "टर्मिनस" हा शब्द हटवण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, २०१९ नंतर पाच वर्षांनी देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले अन् सावंतवाडीकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या त्या कार्यकळात रखडलेल हे टर्मिनस ते पूर्णत्वास आणतील अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. हे अर्धवट काम फडणवीस पूर्ण करतील का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीतच, महाराष्ट्राचे कारभारी देवेंद्र फडणवीस त्यांच हे अर्धवट काम पूर्णत्वास नेतात की टर्मिनस कोनशिलेपूर्त मर्यादित ठेवतात ? हे येणारा काळच सांगेल.