
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर महायुतीची गोपनीय बैठक सावंतवाडीत पार पडली. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच,माजी नगरसेवक, जि.प.,पं.स. माजी सदस्य यांची बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीस युतीचे उमेदवार दीपक केसरकर व आमदार नितेश राणेंची देखील उपस्थिती होती. तब्बल साडेचार तास ही बैठक पार पडली.
या बैठकीत विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने प्रचार करण्यासाठी एकत्रित नियोजन करण्यासंदर्भात ही बैठक झाल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली. महायुतीच्या उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या संदर्भात सूचना करण्यात आल्या. तसेच शुक्रवारी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे अशी माहिती मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच सरपंच उपसरपंच यांची समन्वयाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात सूचना दिल्याचे समजले. तर काहींचे कान टोचल्याचीही माहीती मिळाली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे काम न करणाऱ्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आली. अंतर्गत असलेले गैरसमज दूर करण्यात आल्यानंतर सर्वांनीच एक दिलाने काम करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे महायुतीच्या या संघटित ताकदीमुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास उमेदवार दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले, शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, भाजपचे जिल्हा संघटक महेश सारंग, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.