
सावंतवाडी : महाविकास आघाडीतील बंडखोरीनंतर आता महायुतीत देखील बंडखोरी होत आहे. भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब अपक्ष अर्ज दाखल करत आहेत. यातच शनिवारी नारायण राणेंच्या झंझावाती दौऱ्यानंतर सावंतवाडी मतदारसंघातील राजकीय तवा मात्र चांगलाच तापला आहे.
खासदार नारायण राणेंनी आजच्या दौऱ्यात महायुती धर्म पाळण्याच आवाहन पदाधिकारी , कार्यकर्ते यांना केले. युतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठी कामाला लागा असे निर्देश त्यांनी दिले आहे. त्यात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब महायुतीतून बंडखोरीच्या तयारीत आहेत. सोमवारी ते आपली उमेदवारी भरणार आहेत. अलिकडे राणेंचे फोटो विशाल परब यांच्या कार्यक्रम, बॅनरमधून दिसून येत नव्हते. भाजपातील एक गट विशाल परब यांच्यासोबत दिसत होता. त्यात आता अपक्ष लढण्याचा निर्धार परब यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण यांच्यासह श्री.परब यांची बैठक झाल्याचे वृत्त देखील समोर येत आहे. मात्र, त्यानंतरही विशाल परब भुमिकेवर ठाम आहेत. त्यात नारायण राणेंच्या आजच्या दौऱ्यानंतर परब यांच्यासह असणारे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते कोणती ? भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकंदरीत, सावंतवाडीतील राजकीय वातावरण तापले आहे. कोकणात महायुतीत होणारी बंडाळी रोखण्यात नेते अपयशी ठरल्याने सावंतवाडीच राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तविले असून तापलेल्या तव्याचे चटके कोणाला बसणार ? हे पहावे लागणार आहे.