
सावंतवाडी : नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्या स्लॅबला गळती लागल्याने दुकानांमध्ये पाणी येत आहे. यामुळे कपडे व अन्य वस्तू खराब झाल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी सद्यस्थितीत तात्पुरती डागडुजी करून पावसाळ्यानंतर त्वरित याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
नगरपरिषदेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलाच्यावरील भागात असलेल्या सभागृहालगत मोठ्या प्रमाणात स्लॅबवर पावसाचे पाणी साचले आहे. हे साचलेले पाणी स्लॅबमधून खाली झिरपत आहे. तळमजल्यावर असलेल्या अनेक दुकानांमध्ये हे पाणी शिरत आहे. त्यामुळे कापड दुकानदार राजेश तांडेल, दुर्गादास भांबुरे, विश्वेश पांगम, शेखर सुभेदार, गुरु वारंग, साहिल पारकर यांसह काही व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांच्यासह त्वरित घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडली. दुकानांप्रमाणेच जिन्याच्या लगत असलेल्या मीटर बॉक्स मध्येही पाणी शिरत असल्याने त्याचा मोठा फटका संकुलाला बसू शकतो तसेच अपघात होऊ शकतो हे व्यापाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्वरित वायरमन ला बोलून याबाबत कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली. तसेच गळती होत असलेल्या स्लॅब बाबत निविदा काढण्यात आली असून पावसाळा संपताच ते काम देखील त्वरित करून घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
मात्र, अजून दोन ते तीन महिने पावसाळा संपण्याचा कालावधी आहे. सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे मुख्याधिकारी पावसाळा संपेपर्यंत वाट पाहणार असतील तर तोपर्यंत होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित व्यापाऱ्यांनी केला.यावर संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना सद्यस्थिती तात्पुरती डागडुजी करून गळती होत असलेले पाणी थांबवा, अशा सूचना केल्या. तसेच हे काम करून घेण्याची जबाबदारी आपली आहे आपण पावसाळ्यानंतर स्वतः लक्ष घालून हे काम करून घेईल अशी ग्वाही देखील त्यांनी उपस्थित व्यापाऱ्यांना दिली. त्यावेळी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांनी संजू परब यांचे आभार मानले.याप्रसंगी भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, भाजपचे पदाधिकारी विनोद सावंत, सचिन साटेलकर, कुणाल शृंगारे, गुरु वारंग आदी उपस्थित होते.