
दोडामार्ग : दोडामार्ग नगरपंचायतीतील सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या असलेली पी.एम.श्री जिल्हा परिषद शाळा सावंतवाडा आज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. 1992 साली स्थापन झालेल्या या शाळेला आजतागायत विद्यार्थ्यांना येण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध झालेला नाही. याच कारणामुळे विद्यार्थी संख्येत दिवसेंदिवस घट होत असून पालक व विद्यार्थी दोघांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कोणी वाट देता काय वाट अस म्हणण्याची आज वेळ आली आहे. यामुळे 15 ऑगस्ट रोजी दोडामार्ग तहसील कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सावंतवाडा येथील शाळेची इमारत असूनही तिची जमीन अद्याप जिल्हा परिषदच्या नावावर झालेली नाही. त्यामुळे शाळेच्या परिसरात कुठलाही विकासात्मक उपक्रम हाती घेणे शक्य झाले आहे. शाळेच्या परिसरात काही सुधारणा करण्याचा प्रयत्न झाला, तरी स्थानिकस्तरावर विरोधाचा सामना करावा लागतो. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी व शाळेला हक्काचा रस्ता आणि जमीन जिल्हा परिषदच्या नावावर करून घेण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता तहसीलदार कार्यालय, दोडामार्ग येथे लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.
या उपोषणात समीर शशिकांत रेडकर, मनोज विठ्ठल खांबल, गौतम गोविंद महाले, केशव प्रकाश काळबेकर, सलोनी संतोष म्हावळणकर, ममता सागर नाईक आदी नागरिक सहभागी होणार आहेत. या विषयावर प्रांत, नगरपंचायत, तहसीलदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी निवेदने देऊनही आजवर काहीही ठोस कृती झालेली नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
“पी.एम.श्री” योजनेत समाविष्ट असलेली शाळा असून देखील या शाळेच्या व्यवस्थापनाकडे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणींकडे शासन आणि स्थानिक प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे आम्ही आता रस्त्यावर उतरून आपला आवाज पोचवण्याचा निर्णय घेतला आहे,” असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या उपोषणात सहभागी होत असलेले पालक आणि नागरिक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.