सावंतवाडीत सावरकर गौरव यात्रा !

भाजप-सेना एकत्र ; शक्तीप्रदर्शनासाठी चढाओढ
Edited by: विनायक गांवस
Published on: April 03, 2023 19:39 PM
views 246  views

सावंतवाडी : स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर कॉग्रेसकडून सातत्यानं होणाऱ्या अवमानानंतर देशभरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ही यात्रा सोमवारी पार पडली. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 'मी सावरकर' चा नारा देत शहरातून सावरकर गौरव यात्रा काढली. या यात्रेदरम्यान भाजप व शिवसेना यांच्यातील शक्ती प्रदर्शनासाठीची चढाओढ मात्र लपून राहिली नाही.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यभर विधानसभा क्षेत्रात या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सोमवारी ही यात्रा पार पडली. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवसेनेन तर राजेसाहेब शिवरामराजे भोंसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपनं या यात्रेचा शुभारंभ केला. यानंतर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे शहरातून गौरव यात्रा काढली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली.


शहरातून निघालेल्या यात्रेचा समारोप नारायण मंदिर येथे झाला. या यात्रेत शिवसेनेचा रथ लक्षवेधी ठरला. सावरकरांचा वेश परिधान केलेला युवक या रथात पहायला मिळाला. कु. सई स्वागत नाटेकर हीन सावरकरांची गाथा सांगत उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

  

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले, यात्रेत हिंदू प्रेमींनी दाखवलेला सहभाग लक्षात घेता विरोधकांना व सावरकरांवर टीका करणाऱ्यांना एक प्रकारे चपराक आहे. त्यामुळे यापुढे कोणीही सावरकरांवर अपमानास्पद शब्द काढण्याची हिंमत करणार नाही. विरोधकांकडे टीका करण्यासाठी काहीच कारण शिल्लक राहिले नाही. त्यामुळे नको ते विषय पुढे करून राजकारण करत आहेत. दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेले बलिदान पाहता आजची ही यात्रा म्हणजे त्यांचा गौरव करणारी आहे. सावरकरांवरांवर टीका करणाऱ्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. ११ वर्ष नको, सावरकरांनी जे भोगल ते ११ तास सहन करून दाखवा अस विधानं त्यांनी केलं.


दरम्यान, शिवसेनेनं जोरदार शक्तिप्रदर्शन केल. सभा समारोपस्थळी शिवसेनेन आपला भगवा झेंडा फडकवल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा फडकवला. यावेळी सेना-भाजपात चढाओढ पहायला मिळाली. 


याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, बाबू कुडतरकर, नारायण ऊर्फ बबन राणे, रवींद्र मडगावकर, शेखर गावकर, अजय गोंदावळे, अँड. परिमल नाईक, सुधीर आडीवरेकर, प्रमोद कामत, अँड. नीता कविटकर, शुभांगी सुकी, बाळ पुराणिक आदिंसह शिवसेना भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते.