
सावर्डे : सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे प्रख्यात चित्रकार, शिक्षक आणि लेखक श्री. संतोष मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांचा ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. हा वेबिनार दिनांक १२ नोव्हेंबर २०२५, बुधवार पासून सुरू झाला आहे.
पहिल्या दिवशी श्री. मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चित्रकलेतील कल्पनाशक्तीचे महत्त्व, रचना आणि रंगसंगतीचा सर्जनशील वापर, तसेच कलाकाराने स्वतःची ओळख कशी निर्माण करावी यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या कलाप्रवासातील प्रेरणादायी अनुभवही विद्यार्थ्यांसोबत शेअर केले.
वेबिनारच्या दुसऱ्या दिवशी चित्रकलेतील नव्या तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल आर्टचे वाढते महत्त्व आणि कलेच्या माध्यमातून समाजाशी संवाद या विषयांवर चर्चा होणार आहे.
या उपक्रमाला सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे चेअरमन चित्रकार -शिल्पकार प्रा. प्रकाश राजेशिर्के, प्राचार्य माणिक यादव, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत असून, हा वेबिनार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरत आहे.










