सावडावला केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा - ज्ञानी मी होणार महोत्सवाच उद्घाटन

Edited by: उमेश बुचडे
Published on: December 12, 2023 11:12 AM
views 178  views

कणकवली : विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने गेली अनेक वर्षे सुरू  असलेला जि.प.सिंधुदुर्ग चा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. या महोत्सवातून उद्याचे उत्कृष्ट खेळाडू आणि प्रज्ञावंत, बुद्धिवंत विद्यार्थी घडतील ,यासाठी विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटी ठेवून प्रत्येेक स्पर्धेला आत्मविश्वासाने  सामोरे जावे .असे प्रतिपादन सावडाव सरपंच  आर्या वारंग यांनी केले. 

सावडाव केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने  केंद्रशाळा सावडाव नं.१ येथे त्या बोलत होत्या. यावेळी सावडाव उपसरपंच दत्ताराम काटे, कणकवली गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, ओटव सरपंच रुहिता तांबे, भरणी सरपंच अनिल बागवे,ओटव माजी सरपंच हेमंत परूळेकर, शाळा व्यवस्थापन समिती सावडाव नं.१ अध्यक्ष दिपक वारंग, सावडाव पोलीस पाटील अंकुश वारंग,सावडाव तंटामुक्ती अध्यक्ष संजय झगडे, सावडाव ग्रामपंचायत सदस्य मानसी पुजारे, सुनिता तेली, अजय जाधव, विश्वनाथ खांदारे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  संतोष तांबे (ओटव नं.१),सत्यवान डगरे (सावडाव डगरेवाडी)रणजित घाडीगावकर ( माईण नं.१)प्रकाश बागवे (भरणी नं.१) निवृत्त केंद्रप्रमुख र.स.कामतेकर, आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.

सावडाव केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे अध्यक्ष सरपंच आर्या वारंग, महोत्सवाचे उद्घाटक उपसरपंच दत्ताराम काटे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते  दीपप्रज्वलन करण्यात आले. केंद्रशाळा सावडाव नं.१ ने ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. तर क्रीडाज्योतीचे संचलन जिल्हा क्रीडा शिष्यवृत्तीधारक हर्षाली सावंत, आणि इतर विद्यार्थी यांनी केले. सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना कार्तिकी काटे हिने क्रीडा शपथ देवून सर्व स्पर्धा सचोटीने आणि खिलाडूवृत्तीने पार पाडण्याची प्रतिज्ञा केली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी स्पर्धक विद्यार्थ्यांना सदिच्छा देताना सांगितले की,विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले तर जीवनात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतील. उद्याच्या बलशाही भारताचे स्वप्न पुरे करण्याची जिद्द आणि ऊर्जा या भावी पिढीमध्ये आहे. फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सतत प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी  अशा बाल कला, क्रीडा महोत्सवातून विद्यार्थी नक्कीच जबाबदार नागरिक घडतील असा विश्वास व्यक्त केला. 

ओटव माजी सरपंच हेमंत परूळेकर यांनीही आपल्या मनोगतातून सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धेच्या नियोजनाची भुमिका स्पष्ट करून केंद्रातील सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख श्री.कुबल, सावडाव केंद्रमुख्याध्यापक सौ. प्रणिता लोकरे आणि क्रीडाप्रमुख श्री.किसन दुखंडे यांनी उपस्थितांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले, तर आभार माया दबडे आणि किसन दुखंडे यांनी मानले. महोत्सवाच्या आयोजनासाठी सावडाव ग्रामस्थ, पालक आणि केंद्रातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक आणि शिक्षणप्रेमी पालकांचे विशेष सहकार्य लाभले.