सातुळी - बावळाट शाळेसमोर उभारले गतिरोधक

Edited by: विनायक गांवस
Published on: April 29, 2025 20:16 PM
views 55  views

सावंतवाडी : बांदा - दाणोली जिल्हा मार्गालगत असलेल्या सातुळी आणि बावळाट शाळेसमोरील संभाव्य अपघात लक्षात घेऊन रविवारी दोन्ही शाळा समोर गतिरोधक  उभारण्यात आले. एस जी फाऊंडेशनचे संस्थापक संदेश गांवकर यांनी  याबाबत पालक मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधताच याची तात्काळ दखल घेऊन हे गतिरोधक उभारण्यात आले. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांसह पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.      

बांदा - दाणोली जिल्हा मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असून या जिल्हा मार्गालगतच्या सातुळी आणि बावळाट शाळेसमोर गतिरोधक नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत येताना व जाताना या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असे अनेक प्रकार घडले सुदैवाने दुर्घटना घडली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे ग्रामस्थांनी अनेक वेळा लक्ष वेधले मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. बावळाट गावचे सुपुत्र असलेले तथा मुंबईस्थित एस जी फाऊंडेशनचे संस्थापक संदेश गांवकर यांनी याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून त्वरीत कार्यवाहीची मागणी केली. त्यानंतर याची तात्काळ दखल घेऊन सातुळी आणि बावळाट या दोन्ही शाळेसमोर गतिरोधक उभारण्यात आले.

यावेळी भास्कर परब, बाबु सावंत, सुरेश कदम, अरूण गांवकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून या शाळेसमोरील गतिरोधकाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे पालकांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.