
देवगड : सातारा येथील सैनिक स्कूलसाठी विराज कोदले या देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोरसोळे नं. १ या प्रशाळेतील विद्यार्थ्याची निवड झाली आहे. येथील विद्यार्थी कु. विराज सुनील कोदले यांची सातारा येथील नामांकित सैनिक स्कूलसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे ५ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत विराज कोदले याने ३०० पैकी २७६ गुण मिळवून पहिल्याच फेरीत यशस्वीरित्या प्रवेश मिळवला. साळशी सारख्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण घेत असतानाच त्याने लहानपणापासून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. त्याचे हे यश निश्चितच गौरवास्पद आणि प्रेरणादायी आहे.
या त्याच्या यशामागे आयडियल अकॅडमी, सरवडे येथील सर्वेसर्वा महेश बुजरे सर व संपूर्ण शिक्षकवृंद, शिष्यवृत्ती मार्गदर्शक आदरणीय संजय शिंदे सर, तोरसोळे शाळेचे मुख्याध्यापक सत्यवान चव्हाण सर, उपशिक्षिका सुनीता मुसांडे मॅडम, वर्गशिक्षक किरण पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे त्याची आई – शिक्षिका सौ. स्मिता कोदले आणि वडील – शिक्षक श्री. सुनील कोदले यांचेही विशेष योगदान राहिले. या त्याच्या यशाबद्दल तोरसोळे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.