
सावंतवाडी : 'साटम गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पायी' या नामघोषात दाणोलीनगरी दुमदुमून गेली. कोकणातील संतांचे संत शिरोमणी साटम महाराज यांच्या ८८व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पुण्यतिथी सोहळ्या निमित्त सकाळपासून महाराष्ट्रासह लगतच्या गोवा व कर्नाटक भागातील हजारो भाविक साटम महाराज चरणी लीन झाले. काकड आरती, अभ्यंगस्नान, बाळू राऊळ बुवा (सांगेली) व सहकारी यांचे सुश्राव्य भजन, झाराप येथील श्री बोभाटे बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अँड श्यामराव सावंत व प्रा.रमा सावंत यांच्याहस्ते साटम महाराजांच्या समाधीसह पाद्यपूजा विधिवत करण्यात आली. त्यानंतर कोलगाव येथील श्री घाटकर यांचे सुमधुर बासरी वादन झाले. झाराप येथील बुवा संदेश सामंत आणि सांगेली येथील बुवा अंकुश सांगेलकर तसेच श्री दळवी बुवा आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सुश्राव्य भजन झाले. महाआरती आटोपल्यानंतर रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका सौ विणा दळवी आणि त्यांचे सहकारी अभंग व भक्ती गीतांचा सुरेख नजराणाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
तसेच सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे निलेश मेस्त्री व सहकारी यांचे सुश्राव्य अभंग गायन, ह भ प नातू व त्यांचे सहकारी यांचे सुश्राव्य किर्तन झाले. या पुण्यतिथी सोहळयानिमित्त साटम महाराजांच्या उत्सव मूर्ती व समाधी परिसराला आकर्षक फुलांनी सजवून भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांचा साज चढविण्यात आला. महाराजांचे समाधी मंदिरही आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त साटम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित सादर करण्यात आलेले हालते देखावे खास आकर्षण ठरले.