
सिंधुदुर्गनगरी : सासोली जमीन मोजणी वादाच्या प्रश्नांवर आपली नाहक बदनामी नको अशा आशयाचे पत्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना विकासक डॉ. निलेश बाणावलीकर यांनी लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपली बाजू मांडताना त्यांनी जिल्ह्यातील काही लोक स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी राजकीय हेतूने प्रेरित होऊन चुकीची माहिती देत असल्याकडेही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.
या लिहिलेल्या आणि प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आजच सोशल मीडियावर आपला सासोली गावाच्या संदर्भातील व्हिडिओ पाहीला. व्हीडिओ पाहून सखेद आश्चर्य वाटले, आपण एक जबाबदार व्यक्ती आहात, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील एक जेष्ठ सदस्य आहात. मीडिया समोर बोलताना आपण वस्तूस्तिथीची शहानिशा करूनच बोलणे उचित होते.
मात्र, तस झालं नाही. मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की मी शोभेची वैद्यकीय पदवी मिरवत नसून गेली 25 वर्षे अविरत रुग्णसेवा बजावत आहे. त्याच बरोबर मी विकासक असून माझा व्यवसाय मी प्रामाणिकपणे तसेच नीतिमत्तेने करीत आहे व माझ्या परीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देत आहे. मी माझ्या कुटुंबियांसोबत दिनांक 11 जुलै रोजी सुट्टीसाठी परदेशी आलो आहे. आज देखील मी आपणास हे पत्र परदेशातूनच लिहीत आहे. त्यामुळे सासोली गावातील दिनांक 15 जुलैच्या प्रकाराशी माझा संबंध जोडण्याचे काहीच कारण नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझे माझ्या व्यवसायामुळे सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत. परंतु दुर्दैवाने आपले वास्तव्य सिंधुदुर्ग येथे नसल्याने त्याचा फायदा घेऊन आपल्या बरोबर असलेले काही लोक स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी तसेच राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपल्याला चुकीची माहिती पूरवीत आहेत. हे मी आपणास यापूर्वी देखील सांगण्याचा प्रयत्न केला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास आहे कीं अशा केवळ आणि केवळ स्वतः च्या फायद्यासाठी आपल्या नेत्यांना गुमराह करणाऱ्या तथाकथित स्थानिक पुढाऱ्यामुळे विनाकारण होणाऱ्या राजकीय नुकसानी खेरीज काहीच पदरी पडत नाही. माझ्यासाठी पैशापेक्षा देखील माझे नाव, प्रतिष्ठा व माणुसकी धर्म अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे यासंदर्भात मी परदेशातून परत
येताच योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन घेणारच आहे. आपण पालकमंत्री आहात त्यामुळे आपल्याला अनेक अधिकार असतील परंतु माझ्यासारख्या एका प्रामाणिक व्यक्तीच नाव विनाकारण बदनाम करण्याचा अधिकार आपणास खचितच नाही. असं पत्र डॉ. बाणावलीकर यांनी लिहून पालकमंत्र्यांना लिहीत चुकीची माहिती देणाऱ्या त्या तथाकथित पुढाऱ्यांवर सुद्धा निशाणा साधला आहे. याबाबतचा आपली बाजू मांडणारा व्हिडिओ ही त्यांनी मिडीयाला प्रसिध्दीसाठी शेअर केला आहे.