सर्वोदय सहकारी पतसंस्था निवडणूक ; प्रकाश मोर्ये विरुद्ध दादा बेळणेकर होणार लढत

Edited by: भरत केसरकर
Published on: October 27, 2023 17:52 PM
views 219  views

कुडाळ : सर्वोदय सहकारी पतसंस्थेची निवडणूक उद्या शनिवारी 28 ऑक्टोबरला होत असून 12 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.38 वर्षानंतर प्रथमच ही निवडणुक होत आहे. या निवडणुकीमध्ये विद्यमान सहकार महर्षी जाधव साहेब सहकार पॅनलचे प्रमुख प्रकाश मोर्ये यांचे विरुद्ध दादा बेळणेकर यांचे सहकार महर्षी शिवरामभाऊ जाधव सहकार वैभव पॅनल अशा दोन पॅनल मध्ये थेट लढत होत आहे. सर्वोदय पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष असलेले प्रकाश मोर्ये यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून मोर्ये यांच्या हातून सत्ता खेचून घेण्यासाठी दादा बेळणेकर, सगुण धुरी, दिलीप माळकर सुभाष भिसे यांच्यासह दादा बेळणेकर यांचे चिरंजीव योगेश बेळणेकर या सर्वाच्या नेतृत्वाखाली विरोधी पॅनलने  शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही निवडणूक निश्चितच रंगतदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे.             

      सर्वोदय पतसंस्थेचे एकुण मतदार सभासद १९९७ आहेत.तर एकुण सभासद २४०९ आहेत.संस्थेचे एकुण भाग भांडवल ९३ लाख ६९ हजार २०० ऐवढे आहे.एकुण ठेवी ११ कोटी ३५ लाख ६८ हजार  २०१ रूपये ऐवढा आहेत.कर्ज वाटप हे १०,६९,८१,७६१ ऐवढे करण्यात आले आहे.थकीत कर्ज हे अंदाजे १६ टक्के आहे.एकुण संचालक १३ आहेत.एक जागा बिनविरोध झाली आहे.प्रकाश मोर्ये पॅनल मधून ६ तर बेळणेकर पॅनल मधून २ असे आठ विद्यमान संचालक रिंगणात आहेत. विद्यमान संचालकात प्रकाश मोर्ये,मुकुंद धुरी,जोसेफ डॉन्टस,उत्तम सराफदार,संदेश राणे,कविता कुडतरकरस हे सत्ताधारी पॅनल कडून तर दादा बेळणेकर,सुभाष भिसे हे विरोधी पॅनलकडून रिंगणात आहे.असे आठ संचालक पुन्हा रिंगणात आहेत.माणगाव,कुडाळ,कामळेवीर,महादेवाचे केरवडे अशा चार शाखा संस्थेच्या आहेत.तर या चार शाखेत एकुण १९ कर्मचारी आहेत.७ पिग्मी एजेंट असून दिवसाला सुमारे लाखाच्या घरात पिग्मी जमा होत आहे.५ मे १९८६ रोजी कै.शिवरामभाऊ जाधव यांनी या पतसंस्थेची स्थापना केली होती.कै.शिवरामभाऊ जाधव,कै.मनोहर चव्हाण,सुभाष भिसे,कै.अमृत राणे,विद्यमान चेअरमन प्रकाश मोर्ये यांची या पतसंस्थेवर आतापर्यंत वर्णी लागली होती. प्रकाश गोविंद राणे गेली तीन वर्षे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे.

    ही निवडणूक दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची करण्यात आली होती.उद्या सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत माणगाव हायस्कूल मध्ये मतदान होत आहे.यानंतर एक तासाच्या विश्रांतीनंतर लगेजच याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.