सरिता पवार यांना शिक्षक भारती संघटनेचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 04, 2024 11:57 AM
views 381  views

कणकवली : आजच्या जमान्यात माणसाच्या जगण्या वागण्यात आणि बोलण्यात जमीन असमानाचा फरक आहे. सध्या समाजमनावर विध्वंसक विचारांची पट्टी बांधण्याचे काम सुरू असताना सरिता पवार यांच्यासारखी सृजन माणसे समाजभान राखून कृतिशील विचारांच्या पायवाटेवर आपल्यासोबत अनेकांना घेऊन जात आहेत. त्यातूनच सक्षम विवेकवादी विचारांच्या समाजउभारणीचे काम सरिता पवार करत आहेत. अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दल शिबिरासारखे अनेक संविधानात्मक त्या उपक्रम राबवत आहेत. गेली 20 वर्षे कथा, निबंध, कविता, ललित लेखांच्या माध्यमातून साहित्यनिर्मिती करत आहेत. त्यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळेच सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन शिक्षक भारती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संजय वेतुरेकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवयित्री तथा सामाजिक कार्यकर्त्या सरिता सदाशिव पवार यांना शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने 2024 सालचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार भारतातील आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी प्रदान करण्यात आला. सरिता पवार यांच्या निवासस्थानी शिक्षक भारती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, महिला आघाडी प्रमुख सुश्मिता चव्हाण यांच्या हस्ते  सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पकुंडी अशा स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला.  यावेळी शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुनील जाधव, कणकवली तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद मसुरकर, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक, शिक्षकेतर पतपेढी संचालक श्री.प्रदीप सावंत,  श्रीमती विद्या शिरसाट, श्री. सत्यपाल लाडगावकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. परमेश्वर सावळे, कुडाळ संपर्कप्रमुख श्री. केशव ढाकरे, असरोंडी प्रशाला मुख्याध्यापक श्री. सुशांत पाटील श्रीमती प्रणिता बांबुळकर, श्री.प्रदीप देसाई, श्री. मनिष तांबे, श्री.अनिकेत वेतुरेकर, श्री. रामदास कापसे , श्री. रोहिदास शिंदे, श्री. संदीप पेंडुरकर, श्री.नितीन माने, श्रीमती तनुजा कापसे , हर्षदा सरमळकर, राजन चव्हाण, नितांत चव्हाण, मैत्रेयी चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिक्षक भारतीच्या महिला आघाडीप्रमुख सुश्मिता चव्हाण म्हणाल्या की, उपक्रमशील प्राथमिक शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांच्या बालमनावर आदर्श संस्कार बिंबवणाऱ्या सरिता पवार यांच्या व्यक्तिमत्वाला साहित्यनिर्मिती, समाजप्रबोधनाची जोड आहे. लहान मुले, युवक, अनाथ बालके अशा विविध समाज घटकांसाठी विशेष उपक्रम त्या राबवत आहेत. शाळा, महाविद्यालय, सामाजिक कार्यक्रमांतून सावित्रीच्या पाऊलखुणा , अंधश्रद्धा आणि स्त्रिया, आजकालची मुले, अंधश्रद्धेच्या बेड्या तोडताना आदी विषयांवर व्याख्याने देत समाजप्रबोधन करत आहेत.सरिता पवार यांच्यासारख्या संवेदनशील, प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाला पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचा मनस्वी आनंद आहे.

यावेळी आपल्या मनोगतात सरिता पवार म्हणाल्या की , शिक्षक भारती संघटना ही पुरोगामी विचारांची परिवर्तनशील विचारांचा आदर्श जपत शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी ठाम भूमिका घेणारी संघटना आहे.सावित्री घरोघरी आहेत. सावित्री घडतायत ,पण जोतिबा घरोघरी निर्माण होणे आजच्या काळात गरजेचे आहे.जोतिबा केवळ पतीनेच बनावे असे नाही तर वडील, भाऊ, मुलगा यांच्या रुपात जोतिबा होणे गरजेचे आहे. विधायक कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या सावित्रीला घरातील या जोतीबाने पाठबळ देणे आवश्यक आहे. सावित्रीमाई च्या मागे प्रत्येक घरातील जोतिबा उभा राहिला तर आजच्या काळातील सावित्री कशातच मागे राहणार नाही.पुरस्काराने आपल्या कामाला आणखी बळ मिळते. आपण ज्या वाटेवर चालत आहोत ती दिशा योग्य असल्याचे माध्यम म्हणजे पुररस्कारातून मिळालेली कौतुकाची थाप असते. सकारात्मक विचारांच्या वाटेवर चालताना हा पुरस्कार नक्कीच प्रेरणादायी ठरेल. यावेळी प्रशांत आडेलकर, प्रदीप सावंत, विद्या शिरसाट, प्रणिता बांबूळकर, सुशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.या पुरस्काराबद्दल पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.