सारीका पाटील खेळ पैठणीच्या ठरल्या विजेत्या

दत्तकृपा प्रतिष्ठानचं आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 03, 2025 11:30 AM
views 168  views

वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी लोकोत्सव २०२५ च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या खेळ पैठणीमध्ये सारिका नितेश पाटील या विजेत्या व वैशाली नामदेव चव्हाण ह्या उपविजेत्या ठरल्या आहेत. "लकी ड्रॉ "तील सोन्याच्या शिक्क्याचे मानकरी श्रीशा केरकर ह्या ठरल्या. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाची मंगळवारी रात्री सांगता झाली. 

येथील दत्तकृपा प्रतिष्ठानच्यावतीने मराठी नववर्षाच्या निमित्ताने " वैभववाडी लोकोत्सव २०२५" चे आयोजन येथील सार्वजनिक मैदानात करण्यात आले होते. गुढीपाडव्याला शोभायात्रेने या लोकोत्सवाचा शुभारंभ झाला होता. या लोकोत्सवाच्या निमित्ताने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील अनेकांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा काल (ता.१ )रात्री झाला. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष श्रध्दा रावराणे, उपनगराध्यक्ष प्रदीप रावराणे, उद्योजक विजय तावडे, बांधकाम सभापती रणजित तावडे, शिक्षण सभापती रोहन रावराणे, माजी नगराध्यक्ष नेहा माईणकर, अक्षता जैतापकर, संगीता चव्हाण, तेजस आंबेकर, कौस्तुभ तावडे, अरविंद गाड, नितीन महाडीक, दत्तात्रय माईणकर, संतोष माईणकर, राकेश कुडतरकर आदी उपस्थित होते.

 तीन दिवसांच्या या महोत्सवात खेळ पैठणीतर्गंत महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. पैठणींच्या खेळामध्ये विजेते पदासाठी सारिका पाटील आणि वैशाली चव्हाण यांच्यामध्ये अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये सौ.पाटील यांनी बाजी मारली व पैठणीच्या मानकरी ठरल्या. सौ.पाटील यांना मानाची पैठणी आणि रेफ्रीजरेटर बक्षिस देण्यात आले. तर उपविजेत्या सौ.चव्हाण यांना कुलर वितरित करण्यात आला. तृतीय क्रमांक पायल तांबे, चतृर्थ क्रमांक अंतरा कानडे, तर पाचवा क्रमांक प्रियांका शिंदे यांनी पटकाविला. या सर्वांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेमध्ये अकुंश जाधव यांनी प्रथम,कृष्णाजी माईणकर यांनी द्वितीय तर दिलीप खोपडे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. लोकोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या विविध स्पर्धाना देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या निमित्ताने लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. याकरिता एकूण ३०बक्षिसे होती. त्यामधील पहील्या क्रमांकाचे सोन्याच्या शिक्क्याचे मानकरी राधानगरी येथील श्रीशा केरकर ह्या ठरल्या. हा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पवार आणि प्रा.संजीवनी पाटील यांनी केले.