संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांवर मोक्का दाखल करा

सिंधुदुर्ग सरपंच संघाची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2025 16:16 PM
views 359  views

सावंतवाडी : बीड जिल्ह्याच्या मस्त्यजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या करण्यात आली आहे. या  प्रकरणात जे आरोपी असतील त्यांची त्वरित चौकशी होऊन मोक्कांतंर्गत कारवाई करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून महाराष्ट्र राज्यात भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याचे कुणास धाडस होणार नाही अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन आज सरपंच संघटनेच्यावतीने सावंतवाडी प्रांताधिकारी हेमंत निकम यांना सादर करण्यात आले.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा  जिल्ह्यातील सर्व सरपंच निषेध करीत असून गावचा प्रथम नागरिक या पदाने गावातील विकासाची व जनतेची सेवा करीत असताना अश्या पद्धतीने कट रचून सरपंचावर हल्ला करून मानवतेला काळीमा लावणाऱ्या अशा पद्धतीने हत्या करण्यात आली हे महाराष्ट्राला हादरविणारी घटना आहे. सरपंच हा गावातील विकासाचा प्रमुख मानला जातो त्या लोकप्रतिनिधी जर अशा प्रकारे हत्या होत असेल तर भविष्यात गावात लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिक कर्तव्य सेवा करण्यास कुणी पुढे येणार नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणून सदर हत्या प्रकरणाची लवकरात लवकर सखोल चोकशी होऊन देशमुख कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन सरपंच संघटनेने सादर केलेल्या निवेदनाद्वारे केले. यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, सावंतवाडी तालुका अध्यक्ष हनुमंत पेडणेकर, नाणोस सरपंच वासुदेव जोशी, निरवडेचे माजी सरपंच प्रमोद गावडे, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, डिंगणे सरपंच संजय डिंगणकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, किनळे सरपंच दीपक नाईक, माडखोल माजी सरपंच संजय लाड, कास सरपंच प्रवीण पंडित, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, उपसरपंच गुरुदास गवंडे, तळवणे सरपंच समीर केरकर, तिरोडा उपसरपंच संदेश केरकर, आजगाव सरपंच यशश्री सौदागर,  उपसरपंच सुशील कामटेकर, ओरस सरपंच शंकर नाईक, धाकोरा सरपंच स्नेहा मुळीक, सातोळी बावळट माजी सरपंच दीनानाथ कशाळीकर, वेर्ले माजी सरपंच सुरेश राऊळ, केसरी माजी सरपंच देवेंद्र सावंत, चराठा सरपंच प्रचिती कुबल यांसह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते. यावेळी उपस्थित सरपंच व उपसरपंचांनी आपापल्या गावातील महसूल संदर्भातील विविध प्रश्नांसंदर्भात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर या सर्व प्रश्नांबाबत आपल्याला लेखी स्वरूपात निवेदने द्या त्याबाबत निश्चितच उचित तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिले.

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ ९ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरातील सरपंच संघटनांच्या माध्यमातून लाक्षणिक बंद पाळला जाणार आहे. याला सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेने देखील पाठिंबा दिला असून या दिवशी जिल्ह्यातील सर्व सरपंच ग्राम पंचायतीत उपस्थित राहून या घटनेचा तीव्र निषेध करतील. मात्र, या दिवशी कोणत्याही शासकीय कामकाजात सहभागी होणार नाहीत अशी माहिती यावेळी सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिली.