दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी संतोष चोडणकर

Edited by: विनायक गांवस
Published on: January 17, 2026 16:09 PM
views 54  views

सावंतवाडी : दैवज्ञ गणपती मंदिर येथे शुक्रवार 9 जानेवारी 2026 रोजी झालेल्या वार्षिक सभेमध्ये एकमताने दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्षपदी संतोष वसंत चोडणकर, उपाध्यक्षपदी शिवशंकर नेरुरकर, सचिवपदी गौरव कारेकर, खजिनदारपदी सुहास चिंदरकर यांची निवड करण्यात आली. 

या सभेमध्ये नवीन वर्षांमध्ये साजरे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच मागील आणि नव्या वर्षांमध्ये शैक्षणिक, राजकीय विविध क्षेत्रांमध्ये यश संपादन केलेल्या, पुरस्कार प्राप्त झालेल्या आपल्या दैवज्ञ समाजाच्या व्यक्तींचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्याचा ठराव नव्या कार्यकारिणी केला. तसेच सुवर्ण व्यवसायमध्ये येणाऱ्या अडीअडचणी, भविष्यातील फायदे तोटे या विषयावर सर्व समाज बांधवांनी चर्चा केली. भविष्यामध्ये आपला समाज एकत्र रहावा यासाठी स्नेहमेळावे  विविध धार्मिक, कार्यक्रम घेण्याचे ठरले. आपल्या व्यवसायामध्ये काळानुसार बदल होत चाललेला आहे त्याप्रमाणे सुवर्ण कारागिरांना नव्या स्वरूपाच्या डिझाइन्स बनवण्याच्या कार्यशाळा घेणे, समाजातील युवकांना प्रोत्साहन देऊन नवीन सुवर्ण कारागीर तयार करणे अशा विषयांवर चर्चा झाली. महिला युवक, युवतींसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याचे ठरले. 

सोन्याच्या आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे सुवर्णकारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यासंबंधी काय करता येईल त्या विषयावर देखील चर्चा करण्यात आली. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रतिस्पर्ध्यांसमोर टिकून राहण्यासाठी त्यांच्याप्रमाणे सुवर्ण व्यवसायिकांनी नवनव्या डिझाइन्स बनवण्याचे प्रशिक्षण घ्यावे नवतरुणांनी नोकरीपेक्षा व्यवसायाकडे वळून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करावा यासाठी लवकरच युवकांसाठी आणि कारागिरांना प्रशिक्षण शिबिर आयोजित केले जाईल असे अध्यक्ष संतोष चोडणकर म्हणाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री राजेश पनवेलकर यांनी आणि जुन्या कार्यकारणीने नवीन निवड झालेल्या कार्यकारणीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी शहरातील दैवज्ञ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.