
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमांतर्गत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराने अर्ज सादर केलेला नाही. मात्र अर्ज उचलण्याच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आत्तापर्यंत एकूण १९८ अर्जंची विक्री.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ५८ तर दुसऱ्या दिवशी ९५ असे एकूण १५३ उमेदवारी अर्ज उचलण्यात आले आहेत. यामध्ये दुसऱ्या दिवशी कुडाळ तालुका सर्वाधिक २८ अर्जांसह आघाडीवर आहे. त्यानंतर सावंतवाडी १८, कणकवली १४, वेंगुर्ला १२, दोडामार्ग ८, मालवण ७, वैभववाडी ५ आणि देवगड ३ अर्जांचा समावेश आहे तर पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी ८० आणि दुसऱ्या दिवशी ११८ असे एकूण १९८ अर्ज इच्छुकांनी उचलले आहेत. येथेही दुसऱ्या दिवशी कुडाळ तालुक्यातून सर्वाधिक ३७ अर्ज उचलण्यात आले, तर वेंगुर्ला ३४, सावंतवाडी १८, मालवण १३, दोडामार्ग १०, देवगड ४ आणि वैभववाडी २ अर्ज घेण्यात आले आहेत.
सर्व तालुक्यांमध्ये अर्ज उचलण्याचा वेग पाहता निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुकांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे. मात्र प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत इच्छुकांनी शेवटच्या टप्प्याची वाट पाहण्याची भूमिका घेतल्याचे दिसून येते.
दरम्यान, आगामी काळात राजकीय पक्षांमध्ये युती-आघाडी जाहीर झाल्यास या इच्छुक उमेदवारांची भूमिका काय असेल, कोण माघार घेणार आणि कोण बंडखोरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अर्ज उचलले असले तरी अंतिम चित्र अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच स्पष्ट होणार आहे.










