बांदा जिल्हा परिषद मतदारसंघात दयानंद कुबल यांच्या नावाची जोरदार चर्चा

सामाजिक योगदानामुळे जनतेचा वाढता पाठिंबा
Edited by:
Published on: January 17, 2026 19:59 PM
views 20  views

सावंतवाडी : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असून बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातून पक्षीय उमेदवारीसाठी दयानंद कुबल यांचे नाव सध्या चर्चेत आहे. नेतर्डे गावातील अभ्यासू, संवेदनशील आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून सिंधुदुर्ग आणि कोकणात ओळख असलेले दयानंद कुबल हे जनमानसात ठसा उमटवणारे नेतृत्व मानले जात आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कार्यामुळे त्यांच्याकडे दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे.


दयानंद कुबल हे सर्वांना सोबत घेऊन जाणारे, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असून त्यांच्या पाठीशी युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहिली आहे. सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि सौहार्दपूर्ण संबंध आहेत. जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यावर सातत्याने उपाययोजना करण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.


केवळ आपल्या जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील गरजू लोकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, सरकारी नोकरभरतीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करणे, शालेय विद्यार्थ्यांना स्कुल किट, सायकल तसेच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत करणे, यासोबतच आरोग्य सेवेसाठी पुढाकार घेण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.


या पार्श्वभूमीवर बांदा मतदारसंघातील नेतर्डे, डिंगणे, असनिये आदी गावांमधून दयानंद कुबल यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव, लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची तळमळ आणि गोरगरीब समाजाच्या प्रगतीसाठी असलेली त्यांची दूरदृष्टी पाहता, बांदा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी त्यांना जिल्हा परिषदेत पाठवण्याचा निर्धार मतदार व्यक्त करत आहेत.


अलीकडेच कुबल यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोकण सन्मान पुरस्काराने गौरविले ही आहे. अशा तडफदार व लोकसंपर्क असलेल्या नेतृत्वाला संधी मिळाल्यास आपणही सहकार्य करू, असे आश्वासन सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून दिले जात आहे.


या पार्श्वभूमीवर, पक्षाने तरुण, कार्यक्षम आणि जनतेशी नाळ जुळलेले नेतृत्व म्हणून दयानंद कुबल यांना संधी द्यावी, अशी मागणी बांदा जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते यांच्यातून  होत आहे.