संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिन उत्साहात !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 27, 2024 12:38 PM
views 77  views

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कराची महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सरकार्यवाह आणि प्रसिद्ध साहित्यिक अनंत वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए. एन. लोखंडे उपस्थित होते.

      

कार्यक्रमाची सुरुवात मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या लाभले अम्हास भाग्य या मराठी भाषा गौरवगीताच्या गायनाने झाली. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला अनंत वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना अनंत वैद्य यांनी  विद्यार्थ्यांना मराठी भाषा, साहित्य यांचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. मराठी बरोबरच सर्व विषयांचा अभ्यास असल्याशिवाय कोणत्याही प्रकारची प्रगती करता येणे शक्य नसते. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी अनेकविध क्षेत्रात पुढे जाण्यासाठी उत्तम भाषाभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन केले. या संदर्भात त्यांनी जागतिक पातळीवर  स्थानिक भाषांना कसे महत्त्वाचे स्थान असते यासंदर्भात अनेक उदाहरणे दिली. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी मराठी भाषा संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

         

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.ए.एन. लोखंडे यांनी कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यांच्या अनेक कवितांचा संदर्भ देत मराठी भाषा आणि साहित्य कसे समृद्ध आहे याची उदाहरणे दिली. त्याचा विद्यार्थ्यांनी उपयोग केला पाहिजे असे सांगितले. यावेळी मराठी विभागातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा आणि स्वाक्षरी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ भेट देऊन गौरवण्यात आले. द्वितीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी गणेश सालमटप्पे याने मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.शरयू आसोलकर  यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष वालावलकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंधाली हडकर आणि रसिका मापसेकर या द्वितीय वर्ष कला या वर्गातील विद्यार्थिनींनी केले. आभार तृतीय वर्षाचा मराठीचा विद्यार्थी विनायक कर्पे याने मानले. यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख डाॅ. व्ही.बी. झोडगे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस.टी. आवटे ,इतिहास विभाग प्रमुख डाॅ. व्ही. जी. भास्कर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला इंग्रजी विभाग प्रमुख डाॅ. बी. ए. तुपेरे डॉ. के. एम. चव्हाण ,डाॅ.डी.जी. चव्हाण, डॉ.गावडे ,प्रा.स्वप्नजा चांदेकर, प्रा. योगिता वाईरकर यांच्यासह विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.यानिमित्ताने तृतीय वर्ष कला शाखेच्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध मराठी  लेखिकांचा परिचय करून देणाऱ्या भीत्तीपत्रकांचे प्रदर्शन आयोजित केले होते.