केंद्र सरकारची संकल्प यात्रा मालवणात !

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: December 30, 2023 16:21 PM
views 71  views

मालवण : केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा मालवणात भरड नाका येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली. भाजपा पदाधिकाऱ्यांनी या यात्रेचे स्वागत केले. कुडाळमध्ये मोदी सरकार या नावावर शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याने भाजपा आणि ठाकरे गट आमनेसामने आला होता. मात्र, मालवणात कोणताही अनुचित प्रकार न घडता यात्रा शांततेत पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

केंद्र सरकारच्यावतीने सध्या सर्वत्र विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजना गावागावात पोहोचविल्या जात आहेत. काल कुडाळनंतर या यात्रेचा रथ हा मालवण येथे दाखल झाला. मालवण नगरपरिषदेच्यावतीने शहरातील भरड नाका येथील मोकळ्या जागेत हा कार्यक्रम पार पडला. यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आले होते. रस्त्यावर आणि कार्यक्रमस्थळी पोलीस लक्ष ठेऊन होते. गस्तही घालण्यात येत होती. सकाळी नियोजित वेळेत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे त्याठिकाणी उपस्थित होते. या आधी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी देखील यावेळी उपस्थिती दर्शवली होती. लाभार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. भाजपा कार्यकर्त्यांनी देखील या रथाचे स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, रविकिरण तोरसकर,  ललित चव्हाण, यासह अन्य उपस्थित होते. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. दुपारी 12 वाजता कार्यक्रमाची कोणतेही गालबोट न लागता सांगता झाली. त्यांतर हा रथ मालवण येथून मार्गस्थ झाला.