संजू परब, आरोप करण्यापेक्षा नाव जाहीर करा : प्र. नगराध्यक्ष अनिल निरवडेकर

सत्कार करू
Edited by: विनायक गांवस
Published on: March 18, 2026 15:26 PM
views 118  views

सावंतवाडी : नगरपरिषदेची सत्तासूत्रे हाती घेतल्यावर दोन महिन्यातच तब्बल ६५ विकासकामांवर आम्ही भर दिला आहे. त्यापैकी जिमखाना मैदान आणि भुयारी गटारी योजना या दोन्ही कामांना अधिक प्राधान्य दिले असून प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापर्यंत हे काम केले आहे. त्यामुळे कोण काय विरोधात बोलतात ? यात आम्हाला रस नसून विकासकामे करण्यावर आमचा अधिक भर असल्याचा टोला प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी विरोधकांना लगावला. तर गॅस पाईपलाईनच्या कामात पैसे घेतल्याचा आरोप करण्यापेक्षा नाव  जाहीर करावं, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करू असे सांगत संजू परब यांच्याकडून जनतेत 'फेक नरेटिव्ह' पसरविण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. आयोजित पत्रकार परिषदेत श्री. निरवडेकर बोलत होते. 

ॲड. निरवडेकर म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषदेची स्थायी समितीची पहिलीच सभा आज पार पडली. या सभेमध्ये तब्बल ६५ विकासकामांवर आम्ही भर दिला असून त्यापैकी नरेंद्र डोंगर येथे ४ कोटी रुपये खर्च करून योगा व मेडिटेशन सेंटर उभारण्यात येणार आहे. तर १ कोटी साठ लाख रुपये खर्चून राजवाडा समोरील तलावाकाठी 'खाऊ गल्ली' उभारण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक प्रभागातील रस्ते, पाणी व इतर सोयी-सुविधा यावर आम्ही सर्वांना समान न्याय या चौकटीत बसून काम सुरू केले आहे. केवळ नगरपालिकेच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांमध्ये आम्ही हे करून दाखवले आहे. त्यामुळे विरोधक काय बोलतात यात आम्हाला रस नसून विकासकामे करण्यात आम्हाला अधिक रस आहे. शहराच्या विकासकामासंदर्भात पहिल्याच कौन्सिलमध्ये भुयारी गटार योजना आणि जिमखाना मैदानासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर प्रत्यक्षात या दोन्ही कामांवर आम्ही प्राधान्याने भर देऊन ही कामे अधिकाधिक क्षमतेने करण्यासाठी पाऊल उचलले आहे. सद्यस्थितीत दोन्ही कामांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यात आला असून कोल्हापूर येथील तज्ज्ञ व्यक्तींकडून यासंदर्भात अभ्यास सुरू आहे. त्याशिवाय शहरातील बॅरिस्टर नाथ पै सभागृहाचे पुन्हा नूतनीकरण करण्यात येणार असून या ठिकाणी असलेल्या त्रुटी दूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंच सहकार्य आम्हाला मिळणार आहे. 


तर दुसरीकडे गॅस पाईपलाईन कामासंदर्भात माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडून सत्ताधारी व्यक्तीवर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. परंतू, पुराव्याशिवाय आरोप करण्यात तथ्य नाही. त्यांनी कमिशन घेणाऱ्याच नाव घ्यावं, आम्ही सत्कार करू असं विधान केलं. संजू परब हे माझे मित्र आहेत. मात्र, मित्र म्हणायचे की नाही याची डेडलाईन ठरवण्याची वेळ आता आली आहे. गॅस पाईपलाईन संदर्भात रस्ते खोदाई आणि त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी व अन्य बाबी संदर्भात नगरपालिकेचा विषय येतो. मात्र, त्या कंपनीला आवश्यक त्या परवानग्या, दरपत्रक शासन पातळीवरून मिळालेल्या आहेत. त्यामुळे कोणी चुकीचे आरोप करू नयेत. मुळात संजू परब हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना ते गांभीर्याने बोलत नसून हसत-हसत बोलतात. त्यामुळे त्यांच्या मनात एक आणि कृतीत दुसरेच असल्याचे दिसून येते. त्यांचे एकंदरीत बोलणे पाहता जनतेत फेक नरेटिव्ह पसरविण्याचे काम ते करत आहेत. त्यांनी निलेश राणे यांची सभागृहातील भाषण बघावीत, त्यांचे हावभाव लक्षात घ्यावे. 


दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांचा चावा घेणाऱ्या कुत्र्याचा आम्ही बंदोबस्त केला आहे‌. त्याला केंद्रात ठेवण्यात आला आहे. तसेच मोती तलावा काठच्या झाडाचं काय करायचं ? याचा निर्णय वृक्ष कमिटी घेणार आहे. तसेच पाणी पुरवठा व गॅस पाइपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण काम पुर्णत्वास येईल. काही ठिकाणी नळपाणी काम योग्य नसल्याचे म्हणणे आहे. त्यांच कंत्राट आम्ही सत्तेत येण्यापूर्वी संपलेले आहे‌. मात्र, नागरिकांच्या हिताचा विचार करून काम सुरु केलं आहे. त्यामुळे झालेल्या कामाच ऑडिट होईल नंतर बील अदा करण्यात येतील. अन्यथा, एकही रूपया दिला जाणार नाही अशी माहिती त्यांनी दिली. तर प्रशासकीय काळात काही इमारत बांधकामांना परवानगी दिली गेली. चुकीच काम होत असल्याबाबत काही ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रशासकीय काळात झालेल्या या कामाची चौकशी होईल. तसेच कारवाईची क्षमता देखील आमच्यात आहे. त्यामुळे निश्चितच संबंधितांना न्याय दिला जाईल, येणाऱ्या काळात रिझल्ट दिसेल असा विश्वास ॲड. निरवडेकर यांनी दिला.