राज्यस्तरीय पोलीस कार्यशाळेत सिंधुदुर्गचे सुपुत्र मोहन गवस यांचे प्रभावी मार्गदर्शन

Edited by:
Published on: March 18, 2026 15:34 PM
views 75  views

मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा माजी पोलीस प्रशासकीय अधिकारी मोहन गवस यांना व्याख्यानासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यशाळेत राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविणे, आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहन गवस यांनी प्रशासकीय कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, त्यासंबंधित कायदे व तरतुदी, शिस्तभंगाची कारवाई, तसेच माहिती अधिकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

या राज्यस्तरीय कार्यशाळेत राज्याचे अपर पोलीस महासंचालक मधुकर पांण्डेय यांच्या हस्ते प्रमुख व्याख्याते मोहन गवस यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे विशेष कौतुकही करण्यात आले.

मोहन गवस हे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी असून सध्या ते सिडकोचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन करून जागृती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संवेदनशील चौकशा व शिस्तभंगाच्या प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावीपणे काम करत महाराष्ट्रभर एक तज्ज्ञ अधिकारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.

कार्यशाळेत अपर पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनीही मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेत घेण्यात आलेल्या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव करण्यात आल.