नवी दिल्ली : न्या. संजीव खन्ना हे आज (11 नोव्हेंबर) भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्या. खन्ना यांना सहा महिने आणि एक दिवस इतका कालावधी मिळेल. पुढच्या वर्षी म्हणजे 2025 साली 13 मे रोजी ते निवृत्त होतील. न्या. खन्ना यांचा कार्यकाळ कमी असला तरी सरन्यायाधीशपदी निवड झालेले खन्ना यांचा कार्यकाळ त्यांची क्षमता, त्यांची न्यायिक तत्त्वं आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या मर्यादा बघता कसा असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
ज्या सरन्यायाधीशांना कमी कालावधी मिळाला आहे त्यांचा कार्यकाळ बघितला असता असं लक्षात येतं की जर ठरवलं तर ते अनेक सुधारणा आणू शकतात आणि त्यांचे उत्तराधिकारी त्या पुढे नेऊ शकतात.
2005 मध्ये न्या. खन्ना यांची हायकोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. फेब्रुवारी 2006 मध्ये ते पूर्णवेळ न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. त्यांनी जवळजवळ 23 वर्षं वकिली केली. आधी ते दिल्लीच्या तीस हजारी कॉम्प्लेक्समधील जिल्हा सत्र न्यायालयात होते, त्यानंतर दिल्ली हायकोर्टात वकील होते. त्याचबरोबर कर, लवादाची प्रकरणं, कंपनी कायदा, भूमी अधिग्रहण, आरोग्य आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक ट्रिब्युनल्समध्ये त्यांनी काम केलं. ते प्रत्यक्ष कर विभागाचे वकील होते. त्यांनी राष्ट्रीय राजधानी परिसराचंही प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर त्यांची हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.